आनंदाची बातमी : इयत्ता पाचवी ते आठवीची शाळा उघडणार

Varsha Gaikwad - Exams - Maharashtra Today

इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग आधीच सुरू झालेले असताना आता राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधीचा प्रस्ताव विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला होता. मुख्यमंत्र्यांनी त्यास मान्यता दिली आहे. शालेय शिक्षण क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणारे एक व्हिजन डॉक्युमेंट २०२५ शालेय शिक्षण विभागाने तयार केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत आज त्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ तारखेपासून सुरू होतील असे मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केले. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी नंतर पत्रकारांना सांगितले की, पालकांची सहमती घेऊन, शिक्षकांची आरटीपीसीआर टेस्ट करूनच हे वर्ग सुरू केले जातील. शारिरिक अंतराबाबत आणि कोरोनासंदर्भातील (Corona) अन्य मार्गदर्शक सूचनांची कडक अंमलबजावणी करूनच शाळा सुरू केल्या जाणार आहेत.

गेल्या मार्चमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन (Lockdown) सुरू झाल्यानंतर शाळा बंद करण्यात आल्या होत्या. अनेक शाळांनी आॅनलाइन शिक्षणाची सुविधा विद्यार्थ्यांना दिली. मात्र, राज्यातील ६० टक्के विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित असल्याचे एका संस्थेच्या पाहणीत समोर आले होते.

मुंबई महापालिकेने मात्र मुंबईतील सर्व शाळा १६ जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत बंदच ठेवण्याची भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिकेने शुक्रवारी तसा आदेश काढला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER