खूशखबर : ३१ हजार सातारकरांची कोरोनावर मात

Satara Coronavirus

सातारा : कोरोनाबाधितांचे आकडे कमी होत असल्याने सातारकरांना दिलासा मिळाला आहे. आज ४० हजार १७७ रुग्णांपैकी तब्बल ३१ हजार २२९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा ‘रिकव्हरी रेट’ ८० टक्क्यांनजीक पोहचला आहे. तर काही दिवसांपूर्वी ३० टक्क्यांवर असणारा पॉझिटिव्ह रेट १७ टक्क्यांवर आला आहे.

जिल्ह्यात मार्च ते जुलै महिन्यापर्यंत आटोक्यात असणारा कोरोनाचा संसर्ग ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढला. या एका महिन्यातच तब्बल १५ हजार जण कोरोनाबाधित झाले. तर सप्टेंबरमध्ये एकूण २३ हजार जणांना लागण झाली. या कोरोनाच्या विस्फोटातच एक हजार जणांचे जीवही गेले. त्यामुळे प्रशासनाला घोर लागून राहिला होता.

या कालावधीत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला. रुग्णांना बेड मिळेनासे झाले. रेमडिसिवीर मिळणे दुर्लभ झाले तर ऑक्सिजनशिवाय नागरिकांचे जीव गेले. मात्र, सप्टेंबरचा अखेरचा आठवडा उजाडला आणि हळूहळू पॉझिटिव्हचा रेट कमी येण्यास सुरुवात झाली. तर कोरोनामुक्त वाढू लागले. सध्या रोज येणाऱ्या बाधित यांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा जास्त आहे. जुलै ते सप्टेंबर या महिन्यात जिल्ह्यात सरासरी ६५ टक्के कोरोनामुक्तीचा रेट होता. परंतु, आता तो वाढून ८० टक्क्यांनजीक गेला आहे. अवघ्या काही दिवसांमध्येच तब्बल १५ टक्के रिकव्हरी रेट वाढल्याने प्रशासनाचा भार हलका झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER