गुड न्यूज : सांगलीतील 11 डेडिकेटेड कोरोना रुग्णालये बंद

Sangali Hospital Close

सांगली : जिल्ह्यातील 11 डेडिकेटेड कोरोना रुग्णालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित रुग्णालयांना तसे आदेश जारी केले आहेत. अंतर्गत व बाह्य स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करून या रुग्णालयांनी नॉन कोरोना रुग्णालय (Corona Hospitals )म्हणून सोमवारपासून (दि. 26) रुग्णसेवा सुरू केली जाणार आहेत. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट आल्यास ही रुग्णालये डेडिकेटेड कोरोना रुग्णालय म्हणून पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

खासगी 11 कोरोना रुग्णालये बंद होत आहेत. यामध्ये सांगलीतील घाडगे हॉस्पिटल, दुदनकर हॉस्पिटल, श्वास हॉस्पिटल, अपेक्स हॉस्पिटल, भगवान महावीर कोविड हॉस्पिटल, लाईफकेअर हॉस्पिटल, दक्षिण भारत जैन समाज हॉस्पिटल तसेच इस्लामपूर येथील साई हॉस्पिटल, जत येथील मयुरेश्वर हॉस्पिटल, विटा येथील सिद्धीविनायक कोविड केअर सेंटर आणि कवठेमहांकाळ येथील कोविड हेल्थ सेंटरचा समावेश आहे. डेडीकेटेड रुग्णालयाच्या फॅसिलिटी अ‍ॅपवरील सर्व माहिती अद्यावत करण्यात यावी. प्रशासनाकडून व्हेन्टिलेटर पुरवला असल्यास परत करावा, असे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी आदेशात म्हटले आहे.

ग्रामीण रुग्णालय चिंचणी वांगी, ग्रामीण रुग्णालय कोकरूड, ग्रामीण रुग्णालय भिवघाट ही तीन कोरोना हेल्थ सेंटरही बंद होणार आहेत. या सेंटरमध्ये नव्याने कोरोना रुग्ण दाखल केला जाणार नाही. सध्या दाखल असलेल्यापैकी शेवटच्या रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतर रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण करून नॉन कोविड रुग्ण सेवा सुरू होईल. मिरज शासकीय हॉस्पिटल, सांगली सिव्हील हॉस्पिटल, जिल्हा क्रीडा संकुल कोरोना हेल्थ सेंटर तसेच ती ग्रामीण रुग्णालये (चिंचणी वांगी, कोकरूड, भिवघाट) वगळता अन्य ग्रामीण रुग्णालये कोरोना हॉस्पिटलमधून चालू राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER