खूषखबर ! स्टेट बँकेचे कर्ज व्याजदर झाले कमी

रिझर्व्ह बँकेच्या रेपो दराचा दिला फायदा

State Bank Of India

मुंबई :- रिझर्व्ह बँकेने नुकतीच रेपो दरांमध्ये अर्थात त्यांच्याकडून अन्य बँकांना दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या दरात कपात केली. त्यानंतर त्याचा फायदा सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी केले होते. त्यानुसार देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेने कर्जाच्या व्याजदरात ०.०५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

बुधवारपासून हे नवे दर लागू झाले आहेत. चालू आर्थिक वर्षात स्टेट बँकेने तिसऱ्यांदा कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. यापूर्वी बँकेने एप्रिल आणि मे महिन्यातही अशी घट केली होती. श यादरम्यान, आतापर्यंत बँकेने गृह कर्जावरील व्याज दरातही ०.२० टक्के कपात केली.

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर दास यांनी रेपो दरात केलेल्या कपातीचा लाभ सामान्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यात यावा, असे आवाहन केले होते.

जून महिन्यात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली होती. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, कॉर्पोरेशन बँक, ओरिएंटल बँक आणि आयडीबीआय बँकेने आपल्या एमसीएलआर (कर्ज वितरणाच्या खर्चावरील सरासरी दर) दरात ०.०५ ते ०.१० टक्क्यांची कपात केली होती. रिझर्व्ह बँकेची पुढील बैठक आता ५ ते ८ ऑगस्टदरम्यान होणार आहे.

१ जुलै रोजी आयसीआयसीआय बँकेने एमसीएलआरच्या दरात ०.१० टक्क्यांची कपात केली होती. बँकेचा एका वर्षासाठीचा एमसीएलआर दर ८.६५ टक्के आहे. तसेच यापूर्वी आयडीबीआय बँकेनेही आपल्या एमसीएलआरच्या दरात ०.०५ ते ०.१० टक्कयांची कपात केली होती.