‘बेकायदा मार्गाने केलेल्या सत्कृत्याने त्याचा हेतू चांगला ठरत नाही’

Sujay Vikhe-Patil - Remdesivir - Bombay High Court - Maharashtra Today
Sujay Vikhe-Patil - Remdesivir - Bombay High Court - Maharashtra Today
  • खासदार विखे-पाटील यांना हायकोर्टाचा टोला

औरंगाबाद : उत्पादक कंपनीच्या थेट कारखान्यातून ‘रेमडेसिविर’ इंजेक्शन (Remdesivir) घेऊन ती ‘चार्टर्ड’ विमानाने शिर्डीला आणण्याच्या आपल्या कृतीचे अहमदनगरचे ‘भाजपा’ (BJP) खासदार डॉ. सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe-Patil) यांनी उच्च न्यायालयात वकिलामार्फत समर्थन केले. पण त्यावर न्यायालयाने ‘बेकायदा मार्गाने सत्कृत्य केले तरी त्याने त्याचा हेतू चांगला ठरत नाही’,असा शेरा मारला.

नियमबाह्य पद्धतीने ‘रेमडेसिविर’ इंजेक्शन आणल्याबद्दल खासदार विखे-पाटील यांच्यावर गुन्हा नोंदवून खटला भरला जावा यासाठी केलेल्या याचिकेवर  उच्च न्यायालयात न्या. सुनील शुक्रे  व न्या. भालचंद्र देबडवार यांच्या औरंगाबाद येथील खंडपीठापुढे सुनावणी सुरु आहे. आरोप थेट खासदार विखे-पाटील यांच्यावर असूनही याचिकेत त्यांना प्रतिवादी केलेले नाही. त्यामुळे आपल्याला प्रतिवादी करावे व आपलेही म्हणणे ऐकून घ्यावे, असा अर्ज खासदार विखे-पाटील यांनी केला आहे. या अर्जाच्या अनुषंगाने ज्येष्ठ वकील शिरीष गुप्ते यांनी खासदार विखे-पाटील यांचे म्हणणे सोमवारी न्यायालयापुढे थोडक्यात मांडले. त्यावेळी झालेल्या संभाषणात न्या. शुक्रे यांनी वरीलप्रमाणे शेरा मारला.

अ‍ॅड. गुप्ते यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर न्या. शुक्रे त्यांना म्हणाले की, ही याचिका जनहित याचिका मानायची की साधी फौजदारी याचिका म्हणून सुनावणी घ्यायची, याविषयी आम्ही अद्याप निर्णय घेतलेला नाही. बुधवारी आम्ही आणखी सविस्तर युक्तिवाद  ऐकू आणि त्यानंतरच तुमच्या अर्जावरही निर्णय करू.

खासदार विखे-पाटील यांनी ‘चार्टर्ड’ विमानातून फक्त १,२०० ‘रेमडेसिविर’ इंजेक्शन आणली आणि ती अहमदनगरच्या सिव्हिल सर्जनकडे सुपूर्द केली. परंतु त्यांनी १० हजार इंजेक्शन आणली असा बभ्रा करून पराचा कावळा केला गेला. या एकतर्फी टिकेने त्यांना नाहक बदनाम केले गेले, असे अ‍ॅड. गुप्ते यांचे म्हणणे होते. खासदारांनी मतदारसंघातील जनतेच्या भल्यासाठी इंजेक्शन आणून कोणताही गुन्हा केलेला नाही, असे गुप्ते म्हणाले. त्यावर न्या. शुक्रे  त्यांना म्हणाले की, बेकायदा मार्गाने जरी सत्कृत्य केले तरी त्याने त्याचा हेतू चांगला ठरत नाही.

नेमके काय घडले हे स्पष्ट करताना अ‍ॅड. गुप्ते म्हणाले की, खासदार विखे- पाटील हे स्वत: न्यूरोसर्जन आहेत. त्यांच्या फौंडेशनचे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल आहे. या इस्पितळात २०० कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या इस्पितळाने सिव्हिल सर्जनकडे १,७०० ‘रेमडेसिविर’ इंडेक्शनची मागणी नोंदविली व त्यासाठी १८.१४ लाख रुपये जमा केले. सिव्हिल सर्जननी ती रक्कम पुण्यातील पुरवठादाराकडे पाठविली. परंतु त्यांच्याकडे फक्त ५०० इंजेक्शन उपलब्ध होती व त्यांनी तेवढीच पाठविली. बाकीच्या १,२०० इंजेक्शनचे पैसे दिलेले होतेच. त्यामुळे खासदार विखे-पाटील यांनी चंदिगढला उत्पादक कंपनीच्या थेट कारखन्यात जाऊन तेथून १,२०० इजेक्शन घेतली व ती ‘चार्टर्ड’ विमानाने शिर्डीला आणली.

खंडपीठाने अ‍ॅड. गुप्ते यांचे हे म्हणणे नोंदवून घेतले. पण न्या. शुक्रे त्यांना म्हणाले की, तुम्ही सांगताय ते ऐकल्यावर, तुमच्या अशिलाने झाल्या प्रकाराबद्दल आत्मचिंतन करायला हवे, असे आम्हाला वाटते. विमानातून इंजेक्शन घेऊन येतानाचे व शिर्डीला ते खोके उतरवून घेत असतानाच स्वत:चे फोटो व त्यावरील टिप्पणी समाजमाध्यमांत टाकण्याचा उत्साह त्यांनी दाखविला नसता तर हे सर्व टळू शकले असते.

यावर सहमती दर्शवत गुप्ते म्हणाले की, ते (खासदार विखे-पाटील) तरुण आहेत. त्यांनी उत्साहाच्या भरात ते केले. पण म्हणून काही तो गुन्हा ठरत नाही.

हे सर्व ऐकून याचिकाकर्त्यांच्या वकील अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर म्हणाल्या की, मागच्या तारकेचे रेकॉर्ड तयार करून, यात काही अनियमितता झालीच नाही, असे भासवण्यासाठी सरकार आता सारवासारव करतंय, असे वाटते.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button