आगामी महापालिका निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना ‘अच्छे दिन’

CM Uddhav Thackeray - Sharad Pawar

मुंबई : नुकतेच महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागले. या निवडणुकीत भाजप हा राज्यातील प्रथम क्रमांकाचा पक्ष असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं. तर, राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवून महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) आपल्या मित्रपक्षांनाही बुचकळ्यात टाकले. यात सर्वांत मोठा धक्का बसला तो म्हणजे शिवसेनेला (Shiv Sena). प्रथम क्रमांकाहून थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला. राष्ट्रवादीने (NCP) दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवून ग्रामीण भागात आपली पक्षबांधणी मजबूत केल्याचे दाखवून दिले. तर तुल्यबळ जागा मिळवत शिवसेनेनेही आपल्या पक्षाचा तोंडवळा शहरी नसून ग्रामीण भागातही आपल्याला मोठा जनाधार असल्याचं दाखवून दिलं आहे.

त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यापेक्षा अधिक उजळले आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र टीव्ही-९ मराठीने दिलेल्या विशेष वृत्तावरून आगामी महापालिका निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘अच्छे दिन’ पाहण्याची संधी मिळणार असल्याचे म्हटले आहे.

टीव्ही-९ मराठीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार ग्रामपंचायतीच्या १६०० जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक जागांवर शिवसेना जिंकलेली आहे. उरलेल्या १३ हजार ८३३ जागांपैकी १३ हजार ७६९ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. काही जागांचे निकाल तांत्रिक कारणामुळे रखडले आहेत. जाहीर झालेल्या निकालांपैकी भाजपने ३ हजार २६३, राष्ट्रवादीने २ हजार ९९९, शिवसेनेने २ हजार ८०८, काँग्रेसने २ हजार १५१, मनसेने ३८ आणि स्थानिक गटांनी २ हजार ५१० जागा जिंकल्या आहेत. या निकालावरून महाविकास आघाडी आणि युती अशी तुलना केल्यास महाविकास आघाडीला सर्वाधिक म्हणजे सुमारे आठ हजारांहून अधिक जागा मिळाल्या आहेत. तर युतीकडे तीन हजारांहून अधिक जागा आलेल्या दिसत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने मैदान मारल्याचं दिसून येत आहे; परंतु राजकीय पक्षनिहाय विचार करता सर्वाधिक जागा जिंकून भाजप हा राज्यातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादीने मोठी मजल मारली आहे. तर शिवसेनेला तिसऱ्या आणि काँग्रेसला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याने शिवसेनेची व्होट बँक घटण्याऐवजी वाढलीच आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक ही मिनी विधानसभेची निवडणूक मानली जाते. अशा वेळी शिवसेनेचं यश पाहता शिवसेनेचा या निवडणुकीने फायदाच झाल्याचं दिसून येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलं यश मिळवून शिवसेनेने भाजपची डोकेदुखी वाढवलेली असतानाच आघाडीतही आपला पक्ष मजबूत असल्याचं शिवसेनेनं दाखवून दिलं आहे. शिवसेनेने अनेक वर्षांपासूनच्या शत्रू असलेल्या दोन्ही काँग्रेससोबत युती केल्यानंतरही शिवसेनेची व्होट बँक घटण्याऐवजी वाढली आहे. ग्रामीण भागात वर्चस्व असलेल्या दोन्ही काँग्रेसच्या बरोबरीने शिवसेनेने यश मिळवलं आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेससाठीही शिवसेना आगामी काळात आव्हान ठरणार आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हांवर लढवल्या जात नाहीत. त्या मुक्त चिन्हांवर लढल्या जातात. स्थानिक आघाड्यांमार्फत निवडणूक लढवली जाते. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालावरून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या यशापयशाची तुलना करणं चुकीचं ठरेल. कल्याण-डोंबिवली महापालिका, नवी मुंबई, वसई-विरार महापालिका निवडणुका आणि पुढील वर्षी होणाऱ्या १० महापालिकांच्या निवडणुकीतील यशापयशावरूनच या दोन्ही नेत्यांची तुलना करता येईल. आता अशी तुलना करणं योग्य होणार नाही, असं दैनिक महानगरचे संपादक संजय सावंत यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER