प्रकाश आंबेडकरांना चांगले-वाईट धक्के

badgeअकोला जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने जंग जंग पछाडले; पण भाजप अप्रत्यक्ष मदतीला धावून गेला आणि अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांना घालवणे सोपे नाही हे पुन्हा सिद्ध झाले. गेली २० वर्षे अकोला जिल्हा परिषद प्रकाश आंबेडकरांकडे आहे. यावेळी मात्र धक्का बसणार अशी जोरदार हवा होती. बलाबल तसेच होते. आज झालेल्या निवडणुकीत भाजपच्या सात सदस्यांनी मतदानात भाग न घेतल्याने ‘वंचित’ची ठाकूरकी कायम राहिली. भाजपकडे दुसरा मार्ग नव्हता. तरी पण भाजपने
अप्रत्यक्ष साथ दिल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘वंचित’वर भाजपची ‘बी’ टीम असल्याचा आरोप होतो.

इथे उलटे झाले आहे. त्यामुळे भाजपशी आपले नेमके काय नाते आहे ते सांगण्याची कसरत आंबेडकरांना नव्याने करावी
लागणार आहे. गेल्या काही महिन्यांत प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित आघाडी चांगले-वाईट धक्के सहन करीत आहे. लोकसभापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत खाते उघडता आले नसले तरी वंचित बहुजन आघाडीने लक्षणीय मते घेत दबका निर्माण केला. वंचितचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला. छोट्या प्रमाणात का होईना त्याचा वचपा काढण्यासाठी अकोला जिल्हा परिषद निवडणुकीत घमासान झाले.

अकोला जि.प. : भाजपला महाविकास आघाडीची साथ; भारिपची सत्ता जाणार?

आंबेडकरांना पुन्हा लढायला ऊर्जा देणारा हा विजय आहे. शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस सत्तास्थापनेत एकत्र आल्याने महाराष्ट्रात सत्तेचे नवे समीकरण तयार झाले आहे. त्यामुळे वंचित आघाडीची लढाई सोपी राहिलेली नाही. आपला शत्रू कोण? नवी रणनीती घेऊन आंबेडकरांना मैदानात उतरावे लागेल. अकोल्याबाहेर डाळ शिजत नाही हे वास्तव बदलायचे असेल तर आंबेडकरांना आघाडी म्हणून आपली राजकीय विश्वासार्हता सिद्ध करावी लागेल. कारण बाहेरच्यापेक्षा घरच्यांशीच लढताना आंबेडकरांची दमछाक होताना दिसत आहे.

आनंदराज आंबेडकर आघाडीतून बाहेर पडल्याने ‘वंचित’मध्ये फूट पडली आहे. रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज यांनी वेगळी चूल मांडल्याने आंबेडकरी मतांमध्ये हिस्सा सांगणारा आणखी एक वाटेकरी तयार झाला आहे. आंबेडकरी चळवळीतले गटातटाचे राजकारण हेच मोठे आव्हान आहे.प्रकाश आंबेडकर ते कसे पेलतात त्यावर त्यांची भविष्यातली वाटचाल ठरणार आहे.