मुघलांना धूळ चारत शेवटच्या श्वासापर्यंत लढणारी गोंडराणी ‘दुर्गावती’ !

Maharashtra Today

पंधराव्या शतकात अकबर बादशाहच्या नेतृत्त्वाखाली मुघलांनी भारतभर साम्राज्य विस्ताराला सुरुवात केली. काहींनी गुडघे टेकले तर काहींनी शेवटपर्यंत त्याचा प्रतिकार केला. मध्यभारतावर अकबराची नजर होती. पण हा प्रदेश जिंकणं मुघालांना वाटलं होतं तितकं सोप्प नव्हतं. खास करुन गोंडवाना. यासाठी नाही की एक मोठं साम्राज्य मुघल बादशाहचं प्रतिकार करत होतं, कारण होतं एक महाराणी संपूर्ण स्वाभिमानासह मुघलांचा प्रतिकार करत होती. राज्याच्या संरक्षणासाठी तिनं कडवी झुंज दिली होती. त्या हिंदू राणीच्या समाधीवर आजही हजारो लोक श्रद्धांजलीसाठी फुलं वाहतात आणि तिच्या पराक्रमाचं स्मरण करतात. या राणीच्या नावावर मध्यप्रदेशात विद्यापीठ ही आहे. राणी दुर्गावती विश्वविद्यालय (Rani Durgavati University).

राणी दुर्गावती यांचा जन्म ५ ऑक्टोबर १५२४ साली उत्तरप्रदेशच्या बांदा जिल्ह्यात झाला. तिच्या वडीलांच नाव होतं किर्तिसिंह चंदेला. दुर्गाष्टमीच्या दिवशी जन्मल्यामुळं तिच नाव दुर्गावती ठेवण्यात आलं. चंदेला राजघराण्याची ती एकमेव वारसदार होती. नावाप्रमाण शौर्य, साहस आणि सौंदर्य तिला लाभलं होतं. दुर्गावती ज्या चंदेल राजघराण्यात जन्मली त्याच चंदेल राजांनी खुजराहोच्या मंदिराची स्थापना केली. मोहमद गझनीचं भारतावरील आक्रमण त्यांनी परतवून लावलं होतं. भारतातल्या सर्वात शक्तीशाली राजपरिवारांपैकी एक असलेल्या चंदेल वंशाची ताकद सोळाव्या शतकापर्यंत घटू लागली.

दुर्गावती लहानपणापासूनच शास्त्र आणि शस्त्र या दोन्ही विद्येत त्या पारंगत होत्या. तिच्या पित्याकडूनच तिनं घोडस्वारी, निशाणेबाजी आणि तलवार बाजी शिकली होती. अकबर नामामध्ये अबुल फजलनं राणी दुर्गावती यांच्याबद्दल लिहलंय, “त्या बंदूक आणि तिरंदाजीत निशाणा लावण्यात अव्वल होत्या. त्या नेहमी शिकारीवर जात असत.” वयाच्या १८ व्या वर्षी १५४२ ला त्यांचा विवाह गोंड राजघराण्याचे राजा संग्रामशाह यांचा मोठा मुलगा दलपत शाह याचाशी झाला. मध्यप्रदेशच्या गोंड प्रांतात राहणारे गोंडवंशी लोक गढ-मंडला, देवगड, चंदा आणि खेरला या चार राज्यांवर राज्य करत होते. दुर्गावतीच्या पतीकडे गड- मंडलाचा राजकारभार होता.

दुर्गवती आणि दलपत यांचा विवाह त्यावेळची मोठी राजकीय घटना होती. पहिल्यांद कोण्या राजपूत राजकुमारीनं गोंद वंशात विवाह केला होता. गोंड लोकांची मदत घेऊनच चंदेल वंशानं शेर शाह सुरीच्या आक्रमणापासून राज्य सुरक्षित ठेवलं होतं. १९४५ ला राणी दुर्गावतीनं पुत्राला जन्म दिला. त्याच नाव ठेवलं वीर नारायण. १५५० साली दलपत राजाचा मृत्यू झाला. राजकुमार फक्त पाच वर्षांचा होता. आता राज्य चालवणार कोण? असा प्रश्न लोकांना पडू लागला. राणीनं मुलाला गादीवर बसवलं आणि राज्याच्या कारभाराची सुत्र स्वतःच्या हातात घेतली. राणीच्या शासन काळात प्रजाहिताची मोठी कामं झाली. तिनं विहरी, तलाव, धर्मशाळा आणि मठ बांधून दिले. आजच्या जबलपुर शहराचासुद्धा राणीनं त्याकाळापासून विकास केला.

राणी दुर्गावतीला राजकारणाची दांडगी समज होती. उद्याच्या विद्रोह आणि उठावाच्या शक्यता ध्यानात घेऊन तिनं आधीपासूनच प्रयत्न करायला सुरुवात केली. अनेक मुस्लीम सरदारांना तिनं राज्याच्या बाजूनं करुन घेतलं. काहींना जहागिऱ्या तर काहींना दरबारात मोठी पदं दिली. राजधानी चौरागड वरुन सिंगौरगडला स्थलांतरित केली कारण राजकीय दृष्टा संरक्षणाची सर्वंकष चर्चा योजना तिला करायची होती. पुर्वजांच्या पाऊलावर पाऊल ठेवून तिनं राज्य विस्ताराला सुरुवात केली.

पराक्रमी महाराणी

१५५६ साली माळव्याचा सुल्तान बाज बहादुर यानं गोंडवान्यावर हल्ला केला. दुपारपर्यंत गोंडवणा जिंकून घेऊ या इराद्यानं तलवार उचणाऱ्या बाज बहादुरला राणीनं रणमैदानात धुळ चारली. शांती पुन्हा प्रस्थापित झाली पण फार थोड्याकाळासाठी. १५६२ साली बादशाह अकबाराला माळव्याचा सुल्तान शरण गेला. याशिवाय रेवा प्रांताला ताब्यात घेणारा असफ खान आता राजा होता. या दोन्ही राज्याचा सीमा गोंडवण्याला लागतात. यामुळं गोंडवाण्याचा समावेश आपल्या साम्राज्यात व्हावा अशी मनोमन इच्छा अकबराची होती. १५६४ साली असफ खाननं गोंडवाणा विरुद्ध तलवार उचलली. या युद्धात राणी दुर्गावती स्वतः फौजेसह मैदानात उतरली. तुलनेत तिचं सैन्यबळ कमी होतं पण धैर्यानं लढून जिंकण्याशिवाय काहीच पर्याय तिच्यापुढं नव्हता.

दुर्गावतीच्या युद्धनितीमुळं मुघलांना आश्चर्याचा धक्का बसला. राणी दुर्गामतीनं तिचं सैन्य जंगल आणि डोंगराळ भागात लपवलं. आणि उरलेलं सैन्य घेऊन तिनं मुघलांवर हल्ला चढवला. राणीचं सैन्य कमी आहे, हा विचार घेऊन असफ खान पुढं आला तेव्हा लपलेल्या सैन्यांन त्यांच्या सैन्यावर बाणांची बरसात केली. असफ खानला माघार घ्यावी लागली. यानंतर तीन वेळा मुघल सैन्य आणि राणी दुर्गामतीच्या सैन्यात युद्ध झालं. या युद्धात तिचा पुत्र वीर नारायण गंभीर जखमी झाला. राणीनं तिच्या पुत्राला सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलं आणि ती पुन्हा युद्धाला उभी राहिली. सैनिकांनी राणीला विनंती केली की तिनं रणभूमितून निघून जावं, मुलाची काळजी घ्यावी पण राणीनं त्यांच ऐकल नाही ती शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिली.
पुढं पराभव जेव्हा स्पष्ट दिसत होता तेव्हा राणीनं सैन्यातल्या अधिकाऱ्याला तिला जीवे मारण्याचे आदेश दिले. शत्रुचा हात तिच्या अंगाला लागू नये म्हणून तिला स्वतःला संपवायचं होतं. सैनिकांनी हे पाप करायला नकार दिला तर राणीनं स्वतःची कट्यार काळजात घुसवून घेतली. २४ जुन १५६४ ला राणी दुर्गावतीचा मृत्यू झाला. राणीच्या मृत्यूनंतर तिच्या मुलानं युद्ध सुरु ठेवलं पण नंतर त्यालाही वीरमरण आलं. यानंतर मंडला राज्य मुघल साम्राज्यात सामील झालं.

आज मध्यप्रदेशमध्ये मंडला हा जिल्हा आहे. चौरागडच्या किल्ल्याला आजही हजारो पर्यटक भेट देतात. विदेशाहून आलेले पर्यटक परतताना राणी दुर्गामतीच्या शौर्य गाथा सोबत घेऊन जातात. जबलपूरच्या मंडला रोडवर बरेला नावाचं ठिकाण आहे. राणी दुर्गावती याच ठिकाणी लढता लढता पडली होती. तिथं राणीची समाधी आहे. १९८८ ला राणीच्या स्मरणार्थ भारत सरकारनं पोस्टल कार्डही काढले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER