
गोंदिया :- गोंदिया हा जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असून मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यालगत आहे. जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी व्यापलेला आहे. दाट वनसंपदेने वेढलेला एक निसर्गरम्य जिल्हा म्हणून हा जिल्हा ओळखला जातो. नागझिरा वने, नवेगाव राष्ट्रीय उद्यान यांमध्ये विपूल वनसंपदा आणि जैवविविधता आहे. धानाचे कोठार आणि तलावांचा जिल्हा अशीही गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. त्यामुळे निसर्गात रमणाऱ्या पर्यटकांसाठी हा जिल्हा नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहीला आहे. शिवाय हा महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा असल्यामुळे महाराष्ट्रावर पडणारी पहिली सूर्यकिरणे या जिल्ह्यावरच पडतात. जिल्ह्यातील सालेकसा, आमगाव, गोंदिया, देवरी हे तालुके राज्याच्या टोकावर वसले असून तेथून मध्यप्रदेश किंवा छत्तीसगड राज्यांचा प्रारंभ होतो.