सोन्याचा पुन्हा नवा टप्पा

- लवकरच ४० हजाराकडे!

Gold

मुंबई : बाजारातील मंदीमुळे गुंतवणुकीचे सन्य सर्व पर्याय संकटात आहेत. यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढत असून त्यामुळे त्याचे दर रोज गगनाला भीडत असल्याचे चित्र आहे. सोन्याच्या दराने मंगळवारी पुन्हा एकदा ३८ हजार ४७० रुपये प्रति तोळ्याचा नवा टप्पा गाठला. सोन्याचा दर प्रति तोळा (दहा ग्रॅम) ४० हजारांवर पोहचणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

श्रावणात सण-वार सुरू झाल्याने दागिन्यांची मागणी वाढेल, त्यामुळं सोन्याच्या दरातदेखील वाढ होण्याची शक्यता आहे. घरांच्या विक्रीतील घट, वाहन-विक्री घट, ऑटो क्षेत्रातील मंद आणि बेरोजगारीतील वाढ, हे घटक एकत्र आल्याने सध्या मंदीचे वातावरण आहे. यामुळेच सोन्यातील गुंतवणूक वाढत आहे.

न्यूयॉर्क येथील बाजारपेठेत सोमवारी सोन्याचा प्रति औंस भाव १५०३.३० डॉलरवर गेला. यामुळे आता सणासुदीच्या दिवसात भारतात १० ग्रॅम सोन्यासाठी ४० हजार रुपये पर्यंत सोन्याचा दर जाण्याची भीती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्यात गुंतवणूक करण्याकडे भर दिला जात आहे. पुढील महिन्यात भारतात सणांची रेलचेल असेल त्यामुळं स्थानिक बाजारात सोन्याची मागणी वाढणार आहे.

मागच्या एक महिन्यांपासून स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या भावात ९ टक्के वाढ झाली आहे. लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा दरात ६.६५ टक्के वाढ होऊन प्रति औंस १,५०२.९२ डॉलरवर पोहचला आहे. बाजारातील तज्ज्ञांनुसार, अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे भयभीत झालेला गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय शोधत आहेत.

त्यामुळे सोन्याकडे त्यांचा ओढा वाढत आहे. विश्लेषकांच्या मते सहा वर्षांत प्रथमच बुधवारी (७ ऑगस्ट) सोने आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति औंस १५०० डॉलरवर गेले. तेथून सोन्याच्या दरातील वाढ अद्याप कायम आहे. जागतिक आणि देशांतर्गत मंदीच्या पार्श्वभूमीवर सोन्यातील गुंतवणूक गुंतवणूकदारांना सुरक्षित वाटत असल्याचे चित्र आहे.