सोन्याच्या किमतीत घसरण; हा आहे आजचा दर

Gold prices fall

मुंबई : चाळिशी पार केलेल्या सोन्याच्या किमतीत आता घसरण झाली असून १५०० रुपयांनी सोने स्वस्त झाले आहे. जागतिक कमॉडीटी बाजारात सोन्याची किंमत कमी झाल्याने आज सोन्याचा भाव ३९ हजार ७८० रुपये आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात अघोषित युद्ध सुरू असल्याने जागतिक कमॉडीटी बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली होती.

मागील आठवडाभरात देशातील कमॉडीटी बाजारात (एमसीएक्स) सोने १५०० रुपयांनी स्वस्त झाले असून सोन्याचा भाव ३९ हजार ७८० रुपयांपर्यंत खाली आला आहे. ‘एमसीएक्स’मध्ये सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ४१ हजार २९३ रुपयांवर गेला होता. सोमवारी सोन्याचा भाव ०.२३ टक्क्याने कमी झाला. तो ३९ हजार ७८० रुपये झाला आहे. तसेत चांदीच्या किमतीतही घसरण झाली आहे. चांदीचा भाव ४७ हजार ७५५ रुपये आहे.

चलन बाजारात रुपयाचे मूल्य वधारत असल्याने सोन्याच्या किमतीत घसरण होत आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितलं की, १५ डिसेंबरपूर्वी अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार-कराराच्या अपेक्षेमुळे सोन्याची विक्री झाली आहे. १५ डिसेंबर ही अमेरिकेसाठी नवीन मुदत आहे. अमेरिकेमध्ये, नोव्हेंबर महिन्यात रोजगाराचे आकडे अपेक्षेहून अधिक चांगले आल्यानंतर, महागड्या धातूंच्या किमतीत घसरण झाल्याची माहिती मिळत आहे. परदेशी बाजारात आलेल्या घसरणीच्या संकेतांमुळे, देशांतर्गत वायदे बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किमतीत एक टक्का आणि चांदीच्या किमतीत दोन टक्क्यांहून अधिक घसरण झाल्याची नोंद करण्यात आली होती. चांदीच्या किमतीत एक हजार रुपये प्रतिकिलोहून अधिक घसरण झाल्याची नोंद करण्यात आली होती.