दावे-प्रतिदाव्यांनी गाजली गोकुळची सभा

Gokul Dudh Sangh

कोल्हापूर : सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रश्नोत्तराच्या गोंधळात अवघ्या ४५ मिनिटात गोकुळ दूध संघाची (Gokul Dudh Sangh) सभा बुधवारी गुंडाळली. गोकुळच्या कारभाराबाबत मुद्दाच नसल्याने विरोधकांनी सभा गुंडाळल्याचा आरोप संचालक मंडळाने केला. तर न झालेल्या सभेचा इतिवृत्तांत वाचून अडचण नको म्हणून सत्ताधाऱ्यांनी सभा गुंडाळल्याचा दावा विरोधकांनी केला.

आज दुपारी एक वाजता सभेला सुरुवात झाली. सकाळी दहा वाजल्यापासूनच सत्ताधारी आघाडीचे समर्थक मंडपात आले होते. तर साडे बारा वाजण्याच्या सुमारास जोरदार शक्तीप्रदर्शन करत विरोधकांनी सभा मंडपात प्रवेश केला. सभेपुढील विषय मंजुरीचा मुद्दा आल्यानंतर विरोधकांनी पहिल्याच मुद्दयावर सत्ताधारींची कोंडी केली. बाबासो देवकर, प्रदीप पाटील, किरण पाटील, मधू चव्हाण, भैय्यासाहेब कुपेकर, सदाशिव चरापले आदींनी मागील वर्षी सभाच झालीच नाही मग इतिवृत्तांत कायम करण्याचा प्रश्नच नाही असा मुद्दा उपस्थित केला. अरुण नरके यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे देवू, मात्र शांत रहा, असे आवाहन केले. दरम्यान, घाणेकर यांनी सभामंचाच्या परवानगीने पुढील ताळेबंद मंजूरीचा विषयाचे वाचन करण्यात सुरुवात केली. यानंतर मात्र विरोधक आक्रमक झाले. सभा झालेलीच नाही, झाली तर चित्रफित दाखवा आणि इतिवृत्त वाचन करा असा आग्रह धरला. विरोधी आघाडी नामंजूर तर सत्ताधारी आघाडीचे समर्थक मंजूर-मंजूरच्या घोषणा देत होते. मागील सभा अणि इतिवृत्त वाचनावर विरोधक ठाम राहिले. हरियाणातून कमी प्रमाणात म्हैशी खरेदीची प्रक्रिया सुटसुटीत करावी, कोरोना काळात गोकुळ कर्मचाऱ्यांना केलेली मदत, अशी दोनच प्रश्नोत्तरे झाली. शांत रहा, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले जाईल, असे वारंवार नरके आणि संचालक सांगत होते. मात्र विरोधी आघाडी मागील सभा आणि इतिवृत्त वाचनावर ठाम राहिली. विरोधकांना सभा चालवायचीच नाही. प्रश्नोत्तरे घ्यायचीच नाहीत, असे सुनावत नरके यांनी सभा संपल्याचे जाहीर केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER