गोकुळचे प्रतिध्वनी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या राजकारणात उमटणार

KOlhapur Gokul

कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी जिल्हा बॅंक बिनविरोध करण्याची इच्छा बोलून दाखवल्याने हाच धागा पकडून गोकुळच्या सत्ताधाऱ्यांनी दूध संघही बिनविरोध करण्याची व्यूहरचना आखली आहे. पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) आणि पी. एन. पाटील (P. N. Patil) आपल्या स्तरावर गोकुळसाठी टोकाचे प्रयत्न करीत असताना जिल्हा बँकेच्या आडाने सुरू असलेली रणनीती कितपत यशस्वी ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. गोकुळचा पेच सोडवताना जिल्हा परिषद अध्यक्ष निवड आणि महापालिकेत राजकारणाचे प्रतिध्वनीही उमटण्याची शक्यता आहे.

जिल्हा बँकेच्या राजकारणात मुश्रीफ यांना मदत करून महादेवराव महाडिक आणि त्यांच्यात समझोत्यासाठी पी. एन. पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. मात्र, सतेज पाटील व खा. संजय मंडलिक यांना महाडिक गटाशी समझोता राजकीयदृष्ट्या परवडणारा नाही. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसला पर्यायाने मुश्रीफ यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वोतोपरी मदत करण्यासह गोकुळसाठी वाढीव जागा देण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी ठेवली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, आ. विनय कोरे, पी.एन.पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्या जिल्हा बँकेच्या राजकारणातील उपद्रव मूल्यावरच गोकुळच्या वाटाघाटी अवलंबून आहेत. गोकुळच्या मागील निवडणुकीमध्ये पैरा फेडण्यासाठी संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाचे सहकार्य सत्ताधारी गटाला केले. परंतु त्याची जाणीव आणि किंमत राखली नाही. अनेक वेळा अपमानित केल्याची खंत मंत्री हसन मुश्रीफ यांनी मागील वर्षी जाहीर पत्रकातून व्यक्त केली होती. गोकुळच्या चर्चेवेळी मानापमानाचा अंक रंगत वाढविण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेची सत्ता पालकमंत्री पाटील यांच्यासाठी तर जिल्हा बँकेची धुरा मंत्री मुश्रीफ यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदी आ. पी.एन.पाटील यांचे पुत्र राहुल पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. आर्थिक सत्ताकेंद्र म्हणून गोकुळची सत्ता सर्वच नेत्यांना उभारी देणारी आहे. गोकुळच्या निमित्ताने जिल्ह्याचे राजकारण मात्र ढवळून निघणार आहे. गोकुळची निवडणूक किंवा बिनविरोधाच्या घडामोडी जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणाऱ्या ठरतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER