गोकुळ निवडणुकीसाठी ३४४१ संस्थांचे ठराव दाखल

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी ३४४१ संस्थांचे ठराव दाखल झाले आहेत.आज जवळ जवळ १२९१ संस्थांनी ठराव दाखल केले.काल पर्यंत २१५० ठराव दाखल झाले होते. उध्या बुधवारी ठराव दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.आज विरोधी गटाने जोरदार शक्ति प्रदर्शन करत मोठ्या प्रमाणावर ठराव दाखल केले. आज विरोधी गटाने २२०० ठराव दाखल केल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांनी केला.काल सत्तारूढ गटाने आपण २४०० ठराव दाखल केल्याचा दावा केला होता.

सत्तारूढ गटात उभी फूट पडली आहे. माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील, अरुणकुमार डोंगळे तसेच माजी अध्यक्ष कै. आनंदराव पाटील-चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील यांनी स्वतंत्रपणे जवळ जवळ काल ५०० ठराव सहायक दुग्ध उपनिबंधक डॉ. गजेंद्र देशमुख यांच्याकडे सादर केले होते.तसेच सत्तारूढ गटातील एक संचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी याआधीच आपला पाठिंबा विरोधी गटाकडे राहील, असे संकेत दिले आहेत.

पालकमंत्री व राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विरोधी गट पूर्ण ताकतीने गोकुळच्या महादेवराव महाडीक व पी.एन.पाटील यांच्या सत्तारूढ गटा विरोधात उतरणार आहे त्यांनी आज प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ति प्रदर्शन करत ठराव दाखल केले.