
नवी दिल्ली :- सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांना अंतरिम स्थगिती दिल्याने आंदोलक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे (Sharad Bobde) यांनी स्थगितीचा निर्णय देताच शेतकऱ्यांचे वकील एम. एल. शर्मा यांनी बोबडेंना साक्षात भगवान असल्याची उपमा दिली.
शेतकऱ्यांच्या भूमिकेवर नाराजी
या आधी सुनावणीदरम्यान, एम. एल. शर्मा यांनी न्यायालयाला सांगितले की, न्यायालय जी कोणती समिती नेमेल त्यापुढे शेतकरी येणार नाहीत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यावर सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली व शेतकऱ्यांची भूमिका न पटणारी आहे, असे ते म्हणाले. कायदे निलंबित करून समिती स्थापन करण्याचा न्यायालयाला अधिकार आहे. न्यायालयाने नेमलेली समिती शिक्षा देणार नाही, ती आम्हाला अहवाल सोपवेल. ती आमच्यासाठी आहे. आंदोलनातून मार्ग काढायचा असेल तर समितीसमोर या, असे आवाहन त्यांनी केले.
नव्या कृषी कायद्यांना केंद्र सरकारने स्थगिती द्यावी, अन्यथा ते काम आम्हाला करावे लागेल, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सोमवारी दिला होता. कृषी कायद्यांचा चिघळलेला प्रश्न सोडविण्यासाठी माजी सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्याचे सूतोवाचही सर्वोच्च न्यायालयाने केले होते. त्यानंतर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने वास्तव जाणून घेण्यासाठी समितीची स्थापना करत असल्याचे सांगितले. या समितीत भारतीय किसान युनियनचे जितेंद्रसिंह मान, डॉ. प्रमोदकुमार जोशी, अशोक गुलाटी (कृषितज्ज्ञ) आणि अनिल घनवट यांचा समावेश आहे.
कृषी कायद्यांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खडपीठासमोर सुनावणी पार पडली. “समितीची स्थापना ही न्याय प्रक्रियेचाच एक भाग आहे. आम्ही कायद्यांना स्थगिती देण्याचा विचार करत आहोत. परंतु ते अनिश्चित काळासाठी असणार नाही. ” असे न्यायालयाने यावेळी सांगितले.
शेतकरी संघटनांकडून वकील एम. एल. शर्मा यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली. “अनेक व्यक्ती चर्चेसाठी आले. परंतु जे मुख्य व्यक्ती आहेत म्हणजेच आपले पंतप्रधान ते मात्र चर्चेसाठी आले नाहीत, असे शेतकऱ्यांचे म्हणणं आहे. ” असे त्यांनी सांगितले. यावर सरन्यायाधीशांनी आम्ही त्यांना बैठकांना जा असे सांगू शकत नाही, असे सांगितले.
#FarmLaws: Supreme Court forms a committee to hold talks https://t.co/eIXr3WcNvA
— ANI (@ANI) January 12, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला