‘देव करतो ते भल्यासाठीच!’ धनंजय मुंडेंनी जाहीर कार्यक्रमात सांगितली राजाची गोष्ट

Dhananjay Munde

मुंबई : रेणू शर्मा (Renu Sharma) आणि करुणा शर्मा या दोघी बहिणींमुळे गेल्या काही दिवसांमध्ये वादात आणि अडचणीत सापडल्यानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) शुक्रवारी पहिल्यांदाच एका जाहीर कार्यक्रमात सहभागी झाले. बीडच्या परळीमध्ये एका कार्यक्रमाचे त्यांना निमंत्रण देण्यात आले होते. यावेळी त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये आपल्यावर गुदरलेल्या प्रसंगांचे अप्रत्यक्ष वर्णन करताना राजा आणि प्रधानाची सांगितलेली गोष्ट सगळ्यांचीच दाद मिळवून गेली. धनंजय मुंडेंनी त्यांच्याच शैलीत लगावलेले हे फटकारे बीडकरांसाठी मात्र विशेष ठरले. धनंजय मुंडे म्हणाले, “मला माझ्या आजीनं ही गोष्ट सांगितली होती.

देव करतो ते भल्यासाठीच करतो. एक राजा असतो. दरबारात बसून तलवार पुसत असतो. राजाचा अंगठा तुटतो. ते बघताच प्रधान म्हणतात, राजे, देव करतो ते भल्यासाठी. राजाला राग आला. राजा प्रधानाला काळ्या कोठडीची शिक्षा ठोठावतो. त्यानंतर राजा शिकारीला निघतो. सोबत फौज होती. दाट जंगलात फौज मागे पडून राजा एकटाच पुढं गेला तेव्हा तिथल्या आदिमानवानं  त्याला पकडलं.नरबळीसाठी राजाला नेण्यात आलं.

पण एका वृद्धाला राजाला अंगठा नसल्याचं लक्षात आलं आणि तो म्हणाला की, याला अंगठा नाही.  त्यामुळे हा नरबळी चालणार नाही. राजाला सोडून देण्यात आलं. राजानं परत येऊन प्रधानाची सुटका केली. प्रधान राजाला म्हणतो, जे होतं ते भल्यासाठी होतं. जर तुम्ही मला तुरुंगात टाकलं नसतं, तर तुमच्यासोबत मी असताना आदिमानवांनी माझा बळी दिला असता! म्हणून सांगतो संजयभाऊ (आमदार संजय दौंड), जे होते ते भल्यासाठी होते!”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER