गोव्यात ‘इफ्फी’मध्ये सहा मराठी चित्रपटांचा माहोल!

IFFI 2019

पणजी : गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर या दरम्यान ‘इफ्फी’ (दि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया) रंगणार आहे. यंदा या महोत्सवात सहा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. गणेश शेलार दिग्दर्शित ‘गढूळ’, सुजय डहाके दिग्दर्शित ‘तुझ्या आयला ‘, समीर विद्वांस दिग्दर्शित ‘आनंदी गोपाळ’, शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित ‘भोंगा’, अनंत महादेवन दिग्दर्शित ‘माई घाट : क्राईम नंबर १०३|२००५’, आदित्य राही आणि गायश्री पाटील दिग्दर्शित ‘फोटो प्रेम’ या मराठी चित्रपटांचा यामध्ये समावेश आहे.

जगभरातील सर्वोत्कृष्ट १५ सिनेमांची निवड यंदा ‘इफ्फी’तील सुवर्ण मयूर पुरस्कार स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. सुवर्ण मयूरच्या शर्यतीत अनंत महादेवन दिग्दर्शित ‘माई घाट : क्राईम नंबर १०३|२००५’ या एकमेव मराठी सिनेमाची निवड झाली आहे. हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. अभिनेत्री उषा जाधव यात मुख्य भूमिकेत आहे.

एकूण ७६ देशांमधील २०० चित्रपट यावेळच्या इफ्फीत प्रदर्शित केले जाणार आहेत. यापैकी २४ चित्रपट हे ऑस्कर नामांकनाच्या स्पर्धेतील आहेत. यंदा ‘इफ्फी’चं सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्यानं मोठ्या संख्येनं रसिक इथे येतील असा अंदाज आहे. एका अर्थाने सिनेमहोत्सवाच्या यंदाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात मराठी सिनेमांनी षटकारच ठोकला आहे.