
मुंबई : एकीकडे महाराष्ट्रात करोनाचा कहर सुरू आहे, राज्यात आज कोरोनाच्या ३५० नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या २६८४ झाली आहे. कोरोनाबाधित २५९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात २२४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
तर महाराष्ट्राला लागूनच असलेलं राज्य करोनामुक्तीच्या मार्गावर आहे. सर्वाधिक परदेशी पर्यटकांचा ओढा असलेल्या गोवा राज्यात गेल्या ११ दिवसामध्ये करोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. राज्यातील एकूण ७ रुग्णांपैकी ५ जणांना उपचार करुन सोडण्यात आलं आहे. तर उर्वरित दोघांवरही उपचार केले जात आहेत. १७ एप्रिलपर्यंत एकही नवा रुग्ण न आढळल्यास गोव्यातील दोन्ही जिल्हे ग्रीन झोन जाहीर केले जातील, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. गोव्यातील दोन जिल्ह्यांपैकी दक्षिण गोवा हा जिल्हा अगोदरच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ग्रीन झोन जाहीर झाला आहे. आता उत्तर गोवाही ग्रीन झोन जाहीर केल्यास पूर्ण राज्य ग्रीन झोनमध्ये असेल.