
शाळेचा उंबरा ओलांडून कॉलेजच्या मोरपंखी दिवसात रमणाऱ्या तरुणाईला वर्षातला कोणता दिवस जास्त आवडत असेल तर तो म्हणजे व्हॅलेंटाईन डे. मैत्रीतून एक स्टेप पुढे जाण्यासाठी आतुर असलेल्या यूथसाठी हा दिवस म्हणजे सोहळाच. पण तुम्हाला माहित आहे का अभिनेत्री गौतमी देशपांडे कॉलेजमध्ये असताना व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) दिवशी कॉलेजला दांडी मारायची. व्हॅलेंटाईन डे दिवशी खास लूक करून कॉलेजला जायला खरेतर मुलींना खूप आवडतं पण गौतमी आणि तिच्या मैत्रिणी मात्र 14 फेब्रुवारीला कॉलेजच्या 100 मीटर आवारात सुद्धा फिरकायच्या नाहीत. गौतमीने एक मजेशीर किस्सा शेअर करत तिच्या कॉलेज जीवनातील व्हॅलेंटाइन डेच्या आठवणी सांगितल्या आहेत.
गौतमी देशपांडेची (Gautami Deshpande) सध्या ‘माझा होशील ना ‘ ही मालिका चांगलीच गाजत आहे. या मालिकेतील तिची सई बिराजदार ही भूमिका अगदी बिनधास्त आहे. अनेक कलाकार हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात देखील सारखेच असतात. त्यांचा स्वभाव हा पडद्यावरच्या भूमिकेशी मिळता जुळता असतो. गौतमी ही कॉलेज जीवनातही अशीच बिनधास्त होती आणि आजही ती तशीच आहे.
व्हॅलेंटाईन डे दिवशी कॉलेजला जाण्यासाठी प्रत्येकाच्याच मनात उत्सुकता असते पण गौतमी याच दिवशी नेमकी दांडी का मारायची हे दस्तुरखुद्द तिनेच शेअर केले आहे. सोशल मीडिया पेजवर खास व्हिडिओ बनवून तिने कॉलेजला दांडी मारण्याचे कारण सांगितलं आहे. गौतमी सांगते , जी मुलगी आवडते तिला प्रपोज करण्यासाठी मुलं वर्षभर वाट बघत असतात आणि त्यासाठी व्हॅलेंटाईन डे हे निमित्त करून या दिवशी तिला प्रपोज करतात. पण आपल्याला प्रपोज करणारी व्यक्ती आपल्याला आवडली नाही आणि आपण तिला नकार दिला तर त्या व्यक्तीचा व्हॅलेंटाईन डे मूड खराब होऊ शकतो आणि हेच कारण होतं मी कधीच व्हॅलेंटाईन डेला कॉलेजमध्ये गेले नाही. आम्ही सगळ्या मैत्रिणी या व्हॅलेंटाईन डे ला दांडी मारायचो. पण मज्जा म्हणजे दुसऱ्या दिवशी मात्र याची खबरबात नक्कीच काढायचो की कुणी कुणाला प्रपोज केलं ? कुणी कुणाला हो म्हटलं ? कोणी कुणाला नकार दिला ? याची माहिती काढायला मात्र मला खूप आवडायचं. मी त्या गोष्टी मध्ये फारच आघाडीवर होते. व्हॅलेंटाइन डेच्या दुसऱ्या दिवसापासून पुढचा आठवडाभर माझा हाच उद्योग असायचा की कोणाच्या जोड्या बनल्या आणि कोणाचा ब्रेकअप झाला हे जाणून घ्यायला मला खूप आवडायचं. व्हॅलेंटाइन डे ला तर मी कधीच कॉलेजला गेले नाही पण माझ्या कॉलेजच्या तीन वर्षात मला एकाही मुलाने प्रपोज केलं नाही. याला कारणही असं होतं की सगळ्यांना वाटायचं की मी खूप फरकळ आहे. अनेकदा कॉलेजमध्ये जशास तसं वागायला वागायला लागायचं. त्यामुळे माझ्या बोलण्यावरून अनेक मुलांना असं वाटायचं की मला प्रपोज केलं तर ही आपल्याला पटकन असं काहीतरी बोलेल की आपला चारचौघात अपमान होईल. पण खरं सांगायचं तर मी खूप फटकळ नव्हते आणि आजही नाही पण एका अर्थी माझ्याबद्दलच्या फटकळपणाच्या गैरसमजामुळे कॉलेजमध्ये मला प्रपोज करायचं धाडस कोणीच केलं नाही. पण आता जर कुणाला मला प्रपोज करायचं असेल तर त्याने मला निसर्गाच्या सहवासात प्रपोज केलं तर ते मला नक्की आवडेल.
गौतमीला निसर्गात रमायला खूप आवडतं. तिला पावसाळी वातावरणामध्ये भटकायला खूप आवडतं आणि त्यामुळेच तिला असं वाटतं की रिमझिम पाऊस असलेलं …. हलकासा वारा असलेलं वातावरण आणि त्या वातावरणामध्ये दोघच लॉंग ड्राईव्हला जायचं आणि त्या ठिकाणी एखादा छान स्पॉट बघून त्याने आपल्याला लग्नाची मागणी घालावी अशी माझी खूप इच्छा आहे.
व्हॅलेंटाईन डे ला कॉलेजला दांडी मारणाऱ्या गौतमीने तिची रोमँटिक डेट कशी असेल हे मात्र मनात पक्कं ठरवले आहे. आता तिच्या बिनधास्तपणावर घायाळ होऊन तिला प्रपोज करावं असं जर कुणाच्या मनात आलं तर गौतमी ने सांगितलेला हा फंडा नक्कीच उपयोगी येऊ शकतो.
सारे तुझ्याचसाठी या मालिकेतून गौतमीची छोट्या पडद्यावर एन्ट्री झाली. या मालिकेत तिने बॉक्सरची भूमिका साकारली होती . सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली माझा होशील ना ती गौतमीची दुसरीच मालिका आहे आणि ती देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या मालिकेच्या नावामध्येच माझा होशील ना असं असल्यामुळे तिने मालिकेचा नायक आदित्यला प्रपोज करण्यासाठी प्रचंड धडपड केली आहे. पण खऱ्या आयुष्यामध्ये जर गौतमीला कुणी आवडलं तर ती स्वतः नाही तर समोरच्या मुलानेच तिला प्रपोज करावं असं तिला वाटतं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला