ग्रँडमास्टर घड्याळ काढायला विसरला आणि त्याचा प्रतिस्पर्धी न खेळताच जिंकला!

GM Adhiban

ग्रँडमास्टर बी. अधिबान हा बुध्दिबळ स्पर्धेतील डावादरम्यान घड्याळ घालून खेळल्याने दंडित झालेला पहिला भारतीय बुध्दिबळपटू ठरला आहे. यामुळे अहमदाबाद येथे शनिवारी राष्ट्रीय सांघिक खुल्या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीचा डाव शनिवारी त्याला गमवावा लागला. हा 27 वर्षीय खेळाडू अनालॉग पध्दतीचे घड्याळ बांधून खेळताना दिसला.

जागतिक बुध्दिबळ नियंत्रण संस्था ‘फिडे’च्या पंच नियमावलीनुसार कलम 11.3.2.1 मध्ये फसवणुकीविरोधात तरतूद आहे. त्यानुसार डावादरम्यान पंचाकडून मान्यता घेतली असल्याशिवाय कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण सोबत बाळगण्यास मनाई आहे. यानुसार बहुतेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडूंना स्मार्टवॉच वापरण्यास मनाई आहे मात्र मार्च 2018 अखिल भारतीय बुध्दिबळ महासंघाने (एआयसीएफ) ने हा नियम मनगटी घड्यांळासाठीही लागू केला आणि तो अधिकृत राष्ट्रीय स्पर्धा व फिडे मानांकित स्पर्धांना बंधनकारक केला आहे. त्यानुसार ग्रँडमास्टर अधिबानला ही शिक्षा करण्यात आली.

अधिबान हा जगातील पहिल्या शंभर खेळाडूंमध्ये आहे. एवढा अनुभवी खेळाडू असूनही त्याला अ.भा. महासंघाच्या या नियमाची माहिती नव्हती. तो म्हणतो की मला आश्चर्याचा धक्काच बसला. मला या नियमाची माहितीच नव्हती. नुकताच मी जिब्राल्टर मास्टर्स स्पर्धा खेळून आलोय. तिथे तर मी घड्याळ घालूनच पूर्ण स्पर्धेदरम्यान खेळलो. इतरही खेळाडू वेगवेगळ्या प्रकारची घड्याळे बांधुन खेळत होती. जिब्राल्टर येथून आल्याने मी थकलेलो होतो त्यामुळे माझ्या लक्षातच राहिले नाही की मी घड्याळ बांधून खेळतोय. डावात नऊ चाली झाल्यानंतर प्रतिस्पर्ध्याने हरकत घेतली आणि पंचांनी त्याला विजयी घोषित केले. खरंतर मला आधी ताकिद द्यायला हवी होती.

या डावात पराभवासह अधिबानला 7.7 एलो गुणांचाही दंड करण्यात आला.

घड्याळांवरील बंदीच्या या नियमाचे समर्थन करताना एआयसीएफ’चे सचिव भारतसिंग चौहान म्हणाले की, नियमांची अंमलबजावणी सुकर व्हावी यासाठी हा बदल केला आहे. आम्ही वर्षभरात साडेतिनशेच्यावर स्पर्धा घेतो आणि प्रत्येक ठिकाणी पंचांना वेगवेगळी घड्याळे ओळखण्याचे आणि त्यांच्यात फरक करण्याचे प्रशिक्षण देणे अवघड आहे. कोणती घड्याळे अनालॉग आहेत आणि कोणती नाहीत हा फरक ओळखणारे आम्ही तज्ञ नाहीत म्हणून आम्ही सरसकट सर्वच घड्याळांच्या वापरावर बंदी घातली आहे. ब्ल्यूटूथ उपकरणांचा आणि स्मार्टवॉचेसचा काही खेळाडूंनी चोरुनलपून उपयोग केल्याची प्रकरणे उघड झाली आहेत. म्हणून आम्ही सक्तीने या नियमाची अंमलबजावणी करत आहोत.

पाच वेळेचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद यालासुध्दा अलिकडेच या नियमाचा फटका बसलाअसता पण पंचांनी वेळीच ताकिद दिल्याने तो प्रसंग टळला. जानेवारीमध्ये विक आन झी येथील स्पर्धेत डावाच्या आधी आनंद आपले स्मार्टवॉच काढण्यास विसरला होता पण पंचांनी आठवण करून दिल्यावर त्याने लगेच ते काढून ठेवले होते. पुन्हा पुन्हा एखादा खेळाडू चुकत असेल तर त्याचा डाव प्रतिस्पर्ध्याला बहाल करणे आपण समजू शकतो पण एक किंवा दोनवेळा ताकिद न देता थेट शिक्षा करणे म्हणजे जरा अतीच आहे असे आनंदनेही म्हटले आहे. अनालॉग घड्याळाने फसवणूक कशी होऊ शकतै ते कळत नाही अशा शब्दात माजी विश्वविजेती महिला बुध्दिबळपटू सुसान पोल्गर हिनेसुध्दा आश्चर्य व्यक्त केले आहे.

अधिबान हा पेट्रोलियम क्रीडा मंडळासाठी रेल्वेच्या सीआरजी कृष्णाविरुध्द खेळताना हा प्रसंग घडला.मात्र अधिबानने हा डाव गमावल्यावरही त्याच्या संघाने मात्र हा डाव गमावला.

मोठ्या संख्येने खेळाडूंकडून या नियमात बदलाची मागणी करण्यात आली तर या नियमाचा फेरविचार करण्याची आणि त्यात दुरुस्ती करण्याची एआयसीएफची तयारी आहे.