ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांची ‘स्टुडंट प्राइझ अकॅडमी’वर निवड

Ranjitsinh Disale

नवी दिल्ली :- ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांच्या कर्तृत्वाची दखल घेत वार्के फाउंडेशनने त्यांना ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमी’वर नेमले आहे. या समितीत हॉलिवूडमधील (Hollywood) अभिनेते अ‍ॅश्टन कुचर (Ashton Kutcher) व मिला कुनिस (Mila Kunis). ‘चेग’ या शिक्षण – तंत्रज्ञान कंपनीच्या ना-नफा तत्त्वावर काम करणाऱ्या ‘चेग डॉट ओआरजी’च्या सोबत वार्के फाउंडेशनने हा पुरस्कार सुरू केला आहे. अध्ययनावर तसेच समाजावर ठसा उमटवणाऱ्या असामान्य विद्यार्थ्यांचे प्रयत्न जगापुढे आणण्यासाठी नवे व्यासपीठ म्हणून ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ’ सुरू करण्यात आले आहे. अभिनेते अ‍ॅश्टन कुचर व मिला कुनिस, अमेरिकेतील महिलांच्या राष्ट्रीय चमूतील खेळाडू जुली एर्ट्झ व त्यांचे पती झाक एर्ट्झ हे ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमीचे  इतर सदस्य आहेत.

समितीवर निवड झाल्याचा अभिमान

विद्यार्थ्यांमध्ये अमर्याद क्षमता असते. आपण त्यांना योग्य प्रकारचे शिक्षण उपलब्ध करून दिले आणि त्याचे महत्त्व त्यांच्या लक्षात आणून दिले तर ते जग पादाक्रांत करू शकतील. त्यांच्या कथांवर झोत टाकण्यासाठी आणि त्यांचा आवाज ऐकण्यासाठी जागतिक विद्यार्थी पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. या समितीवर निवड झाल्याचा मला अभिमान असून अशा प्रेरणादायक उद्देशाला माझा पाठिंबा आहे. हे प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा शोध घेण्याच्या  दिशेने एक पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया रणजितसिंह डिसले यांनी निवडीनंतर दिली.

रणजितसिंह डिसले यांच्या नावे इटलीतील स्कॉलरशिप!

रणजितसिंह डिसले यांच्या नावाने इटलीतील विद्यार्थ्यांना ‘कार्लो मझोने- रणजित डिसले स्कॉलरशिप’ या नावाने ४०० युरोची स्कॉलरशिप इटलीतील सॅमनिटे राज्यातील १० विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. बेनव्हेंटोचे महापौर, कॅम्पानिया प्रांताचे शिक्षण अधिकारी या मुलांची निवड करणार असून पुढील १० वर्षे १०० मुलांना ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे. रणजितसिंह डिसले सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी शाळेत शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या साहाय्याने शिकवण्यासाठी डिसले प्रसिद्ध आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून, शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे तसेच इतर शिक्षकांनाही टेक्नोसॅव्ही होण्यासाठी प्रेरित केले आहे. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटेखानी प्रयोगशाळा उभारली आहे. लॉकडाऊनमध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा वापर करून त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button