यांना द्या घरीच स्टँण्डिंग ओव्हेशन

Maharashtra Today

Shailendra Paranjapeमराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)तिढा काही सुटत नाही. माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस(Devendra Fadnavis), भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) हे विरोधी पक्षाकडून आणि कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्रिमंडळातले उपमुख्यमंत्री अजित पवार हे रोजच्या रोज परस्परांवर टीकेचे रतीब घालत आहेत. भारतीय जनता पक्षाचं म्हणणं काय तर त्यांनी न्यायालयातून मिळवून दिलेले आरक्षण महाआघाडी सरकारला टिकवता आले नाही कारण त्यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू चोखपणे मांडली नाही. दुसरीकडे मराठा आरक्षणविरोधी याचिकांच्या सत्रामागे भारतीय जनता पक्षच आहे असे आरोप महाआघाडीतल्या घटक पक्षांच्या नेत्यांकडून नियमितपणे केले जात आहेत.

या साऱ्या पार्शवभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना दांभिक असं संबोधलं आहे. अजित पवार यांनी प्रसंगी आरक्षणासाठी मी रस्त्यावर उतरेन, असं वक्तव्यं पवार यांनी केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी दुसऱ्या दादांना चक्क दांभिक करून टाकलंय. आधी आरक्षणाचा खटला नीट लढायचा नाही आणि मिळालेलं आरक्षण घालवून रस्त्यावर उतरायची तयारी दाखवायची, हा दांभिकपणा नाही तर का, असा सवाल भाजपाच्या दादांनी केलाय.
मराठा समाजाचे असलेले आरक्षण घालवून समाजाला रस्त्यावर आणल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता आपणच आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवणे दांभिकपणा आहे, असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी दिले.

चंद्रकांतदादांनी तोफ जोरदार डागली आणि आता टगेदादा काय सोडणारेत काय…ते भाजपा दादांच्या तुलनेत खूपच मुरलेले राजकारणी आहेत आणि काही झाले तरी शरद पवार यांचे पुतणे असल्याने लहानपणापासून त्यांना बघत अजित पवारांनी राजकारणाचे धडे गिरवले आहेत.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी आता रस्त्यावर उतरावे लागेल नाहीतर वेळ निघून जाईल, असे आपण सांगितले. त्यावर अजित पवार यांनी उपरोधिकपणे स्वतःच रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवली. असा दांभिकपणा करण्यापेक्षा त्यांनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करून मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देणे किंवा आमच्या सरकारप्रमाणे वैधानिक प्रक्रिया पूर्ण करून आरक्षण मिळवून देणे, यावर भर द्यावा. तसेच पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत आमच्या सरकारप्रमाणे मराठा समाजाला शिक्षण आणि रोजगारासाठी भरघोस सवलती द्याव्यात आणि त्यासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज द्यावे. त्यांनी मराठा समाजाला दिलासा दिला नाही तर समाज त्यांना तसेही रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही.

माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वातल्या भाजपा-शिवसेना सरकारने न्यायालयीन लढाई जिंकून मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले होते आणि त्याचे श्रेय सामूहिक आहे, असेच फडणवीस यांनी भर विधानसभेत सांगितले होते. असं असताना आणि हे सारं या सर्व घटकांना माहीत असताना हे सारे रोज असं का बोलतात, हा प्रश्न सर्वसामान्यांना सतावतो. त्याचं उत्तर सोपं आहे. मराठा समाजाची सहानुभूती आपल्याला म्हणजे पक्षाला मिळावी, हाच या साऱ्यांचा अधोषित किंवा छुपा कार्यक्रम असतो.

त्यामुळे सामान्य वाचक हो, डोक्याला फार शॉट करून घेऊ नका. कारण शेळी जाते जिवानिशी, खाणारा म्हणतो वातड, अशी काहीशी आपल्या लोकशाहीतली सामान्य गरीबड्या माणसाची अवस्था आहे. उगीचच बघा हे दादा किंवा ते दादा काय भारी बोललेत. त्यांचा ब्रेक डान्स वाहिन्यांसाठी असतो आणि बारामतीच्या नाट्यसंमेलनात डॉ. मोहन आगाशे अध्यक्ष होते तेव्हा अजितदादांनी धमाल आणळी होती. ते म्हणाले होते की तुम्ही तर दोन तीन तास अभिनय करतात. आम्हाला सारं आयुष्य अभिनयच करावा लागतोय आणि अजिबात समजू द्यायचं नसतं की ह्यो अभिनय आहे. आता बोला. तेव्हा नाटकात टाळ्या वाजवता, स्टँडिंग ओव्हेशन देता तसं दोन्ही दादांना आपापल्या घरी बसून करमणूक बघायला मिळाली म्हणून त्यांचे ऋणी राहा.

Disclaimer :’संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button