राज्यातील राष्ट्रीय महामार्गांसाठी २० हजार कोटी द्या

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांची केंद्र शासनाकडे मागणी

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संवाद


नांदेड :– राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या महामार्गाच्या निर्मितीसाठी अनेक अडचणी येत आहेत, काही प्रश्न निर्माण झाले आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात यावी व त्यासोबतच राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम जलद गतीने होण्यासाठी २० हजार कोटी रूपयांचा निधी केंद्र सरकारने राज्यातील राष्ट्रीय महामार्गास द्यावा अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आज केली.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सचिव यांच्याशी दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. महाराष्ट्राच्यावतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ते निर्मितीतील विविध अडचणी आणि येणाऱ्या समस्या या विषयी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांना अवगत केले.

राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परंतु अनेक ठेकेदार वेळेवर काम करीत नाहीत. त्यामुळे वाहतूक अडथळा निर्माण होत आहे. जे ठेकेदार विहित वेळेत काम करीत नाहीत अशांची कामे रद्द करावीत व त्यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली. राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची कामे जलद गतीने होण्यासाठी व येणार्‍या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर समितीचे गठण करण्यात यावे व त्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

महाराष्ट्रातील अंकलेश्वर-चोपडा-ब्राहणपूर-देवराई-शेवगांव-नेवासा-संगमनेर, कोल्हापूर-महाबळेश्वर-शिरूर, सागरी मार्ग-खोल-अलिबाग-रत्नागिरी-वेंगुर्ला-रेड्डी-गोवा या मार्गांना राष्ट्रीय महामार्गाची मान्यता देण्यात यावी अशी मागणी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.