एक धक्का और दो… मंदिर वही बनाएंगे – ४

P.V Narasimha Rao - Babri Masjid - Kalyan Singh

नंदीग्राममध्ये (Nandigram) भरताने १४ वर्षे वनवासी रूपात राहून अयोध्येचे राज्य प्रभू रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून चालविले होते. त्याच स्थानावर २६ सप्टेंबर १९९२ रोजी यज्ञ समितीच्यावतीने प्रभू रामांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. ॲाक्टोबरमध्ये गावोगावी या पादुकांच्या पूजनाचे समारंभ आयोजित करण्यात आले. रामभक्तांनी पुन्हा एकदा मंदिर उभारणीचा संकल्प सोडला. २९-३० ॲाक्टोबर १९९२ रोजी नवी दिल्लीत(New Delhi) पाचवी धर्मसंसद झाली. त्यात संतांनी केंद्र सरकारच्या प्रतिसादाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत ६ डिसेंबर १९९२ पासून अयोध्येत पुन्हा कारसेवा सुरू केली जाईल, असे जाहीर केले.

सरकार तोडगा काढण्यात विफल ठरले. त्यामुळे ६ डिसेंबरपासून कारसेवा सुरू करण्यावर धर्मसंसद ठाम राहिली. त्यांच्या काही दिवस आधीपासूनच कारसेवकांचे अयोध्येत पोहचणे सुरू झाले होते. न्यायालयाचा एक आदेश लक्षात घेता त्यांना ओळखपत्र दिले जात होते. तिकडे सर्वोच्च न्यायालयाने उत्तरप्रदेश सरकारला शपथपत्र सादर करण्यास सांगितले. राज्यात सत्तापालट होऊन भाजपचे (BJP) कल्याणसिंह मुख्यमंत्री झाले होते. त्यांच्या सरकारने शपथपत्र सादर करीत त्यात लिहिले की, २.७७ एकर वादग्रस्त जमिनीवर कोणतेही बांधकाम करण्यास अनुमती दिली जाणार नाही. बांधकामाचे साहित्य वा यंत्रसामग्री या परिसरात येऊ दिली जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने सांकेतिक कारसेवेस अनुमती दिली. न्यायालयाने एका पर्यवेक्षकाची नियुक्ती केली आणि त्यांना सर्वघटनाक्रमावर लक्ष ठेवण्यास सांगितले. उत्तरप्रदेश सरकारच्या शपथपत्राचा भंग होऊ नये हा पर्यवेक्षक नियुक्तीचा उद्देश होता.

यज्ञ समितीला असे वाटले की, उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात २.७७ एकर जमिनीसंदर्भात जी याचिका आहे त्यावरील फैसला गीता जयंतीपूर्वी म्हणजे ६ डिसेंबरपूर्वी येईल. त्यामुळेच समितीने कारसेवेची तारीख ६ डिसेंबर ही निश्चित केली होती. तरीही न्यायालयाने ३ डिसेंबरला सुनावणी करताना ११ डिसेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली. ही जागा श्रीरामजन्मभूमी न्यासाच्या मालकीची होती; पण ती आधीच्या मुलायमसिंग सरकारने संपादित केलेली होती. तत्कालीन सरकारने केलेले हे संपादन अवैध असून न्यासाला जमीन परत द्यावी, अशी मागणी न्यासातर्फे न्यायालयात करण्यात आली होती. ११ डिसेंबरला उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात उत्तरप्रदेशने केलेले जमिनीचे संपादन अवैध ठरविले आणि ती जागा न्यासाच्याच मालकीची असल्याचे स्पष्ट केले; पण तोवर शरयूच्या तीरावर भरपूर पाणी निघून गेले होते, इतिहास त्याच्या पाच दिवस आधीच घडला.

६ डिसेंबरपूर्वीच अयोध्येत चार लाख कारसेवक पोहचले. एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या रामभक्तांना कसे समजवायचे असा यज्ञ समितीसमोर प्रश्न होता. कुठेही गोंधळ करू नका, कायदा हातात घेऊ नका, साधुसंतांकडून येणाऱ्या आदेशांचे पालन करा, अशा सूचना वारंवार दिल्या जात होत्या. ज्या ठिकाणी भव्य मंदिर बांधले जावयाचे आहे त्या ठिकाणी रामभक्तांनी प्रतीक म्हणून शरयू नदीतील मूठभर रेती आणून टाकावी, असे सांगण्यात आले. गीता जयंतीच्या दिवशी म्हणजे ६ डिसेंबरला पहाटेच लाखो लोकांनी शरयू नदीत स्रान केले आणि रामकथा कुंजमध्ये ते गर्दी करू लागले. सकाळी १० वाजता कार्यक्रम सुरू झाला. संत आणि आंदोलनाच्या नेत्यांनी मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी काही कारसेवक रामजन्मभूमीजवळील संपादित जागेच्या दिशेने जाऊ लाागले. ही जागा कारसेवकांनी तत्काळ रिकामी करावी अशा सूचना दिल्या जात होत्या, विनंती केली जात होती.

ध्वनिक्षेपकावरून असेही सांगण्यात आले की, जे कारसेवक त्या जागेवर हलत नसतील तर स्वयंसेवकांनी त्यांना उचलून बाहेर करावे; पण कारसेवक कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. कारसेवकांना हटविण्याचे प्रयत्न होताच त्यांच्या संयमाचा बांध फुटला. कारसेवक बॅरिकेडिंग ओलांडून पुढे जाऊ लागले. मग इतर कारसेवकांनाही हिंमत आली आणि जय श्रीरामचा घोष करीत तेही मोठ्या संख्येने पुढे गेले. काही कारसेवक वादग्रस्त वास्तूजवळ पोहचले. व्यासपीठावरील संत, आंदोलनाचे नेते यांनी वारंवार सूचना देऊन कारसेवकांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हतेच. तेवढ्यात असे लक्षात आले की, वादग्रस्त वास्तूच्या दिशेने चाल करून जात असलेले बहुतेक कारसेवक हे दाक्षिणात्य आहेत. त्यामुळे रा.स्व.संघाचे सरकार्यवाह हो.वे.शेषाद्री यांनी कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम भाषेत कारसेवकांना मागे फिरण्याचे आवाहन केले.

भाजपचे अध्यक्ष लालकृष्ण आडवाणी, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती हेदेखील आवाहन करीत होतेच. आपले प्रयत्न तोकडे पडत असल्याचे लक्षात येताच काही नेते मंचावरून उतरले आणि वादग्रस्त वास्तूजवळ जाऊन कारसेवकांना परत फिरण्याची विनंती करू लागले. त्यात अशोक सिंघल, लालकृष्ण अडवाणी हेही होते. काही जणांना त्यांनी परतही पाठविले; पण मोठ्या संख्येने कारसेवक वादग्रस्त वास्तूजवळ जमले, लोंढेच्या लोंढे येऊ लागले आणि गर्दी अनियंत्रित झाली. आंदोलनाचे नेतेच नव्हे तर सुरक्षा यंत्रणादेखील हतबल झाली. कारसेवकांकडे काही औजारे नव्हती, ते हातानेच वादग्रस्त वास्तू पाडू पाहात होते. त्याच वेळी काही तरुणांनी बॅरिकेडिंगचे पाईप काढले आणि त्या लोखंडी पाईपने वादग्रस्त वास्तू तोडायला सुरुवात केली. दुपारी १.३० वाजता त्या वास्तूची भिंत पाडण्यात आली. त्यामुळे आणखीच जोशात आलेल्या कारसेवकांनी मग आणखीच प्रहार सुरू केले.

कारसेवकांची अतिप्रचंड गर्दी झाली होती. कारसेवक वादग्रस्त वास्तूच्या वर चढले आणि त्यांनी दुपारी २.४५ च्या सुमारास पहिला मिनार उद्ध्वस्त केला. सायंकाळी ४.३० वाजता दुसरा मिनार कोसळला. त्याच्याखाली काही कारसेवक दबले पण उत्साह कायम होता. धुळीचे लोटच्या लोट उठत होते, तिसरा मिनारही ढासळला. वादग्रस्त वास्तू जमीनदोस्त झाली. कारसेवकांनी मग वादग्रस्त वास्तूचे ढिगारे हटविले आणि जमीन समतल केली. ६ डिसेंबरची पूर्ण रात्र आणि ७ डिसेंबरलादेखील हे काम सुरूच होते. त्या ठिकाणी एक चबुतरा तयार करण्यात आला आणि पूजा-अर्चना सुरू करण्यात आली. ८ डिसेंबरला केंद्र सरकारच्या आदेशानुसार सुरक्षा दलाचे जवान पोहचले आणि त्यांनी सर्वकाही आपल्या नियंत्रणात घेतले. (क्रमश:)

ह्या बातम्या पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER