शिवसेनेचे ओमराजे निंबाळकरांवर कारवाई करून नाईक कुटुंबीयाप्रमाणे न्याय द्या

- ढवळे परिवाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी

Cm Uddhav Thackeray

उस्मानाबाद : अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीची तत्परतेने दखल घेत कारवाई करण्यात आली, तसेच माझे दिवंगत पती दिलीप ढवळे यांच्या आत्महत्येस जबाबदार असणारे शिवसेना खासदार ओमरा जेनिंबाळकर यांच्यासह इतर आरोपींवर तत्काळ कारवाई करा, अशी मागणी वंदना ढवळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नी वंदना ढवळे यांनी पत्रपरिषद घेऊन ठाकरेंना प्रश्न केला – अन्वय नाईक यांना न्याय, तर आम्ही काय घोडे मारले?

ढवळे कुटुंबीयांनी या प्रकरणाच्या मागील वर्षभरापासून रखडलेल्या तपासावर संताप व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या काळात दस्तूरखुद्द उध्दव ठाकरे यांनी जाहीर सभेत ढवळे कुटुंबीयांना वार्‍यावर सोडणार नाही. त्यांना नक्की न्याय मिळेल, असे वचन दिले होते. याची आठवण वंदना ढवळे यांनी करून दिली. आर्थिक फसवणूक आणि त्यामुळे वाट्याला आलेली मानहानी यामुले माझे पती दिलीप ढवळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, त्या म्हणाल्या.

माझ्या आत्महत्येस ओमराजे निंबाळकर आणि विजय दंडनाईक जबाबदार आहे, असे दिलीप यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले होते. तरीही घटना घडल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होऊन वर्षभराचा कालावधी लोटला आहे. मात्र अद्याप पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले नाही, असे ढवळे यांनी सांगितले.

ढवळे यांचे बंधू राज आणि पुत्र दीपक यांनीही पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याप्रकरणी न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली. दोन दिवसांत आम्ही मुंबईला जाऊन उध्दव ठाकरे यांची भेट घेणार आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यामुळे आपल्या कुटुंबावर ओढावलेल्या संकटाची माहिती देणार, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. नाईक कुटुंबीयांचे गार्‍हाणे ऐकून त्यांनी तत्काळ कारवाई केली. अगदी त्याचप्रमाणेच आरोपी असलेल्या स्वतःच्या पक्षातील खासदाराला पाठीशी न घालता ते आमच्या कुटुंबीयांना न्याय देतील, अशी अपेक्षाही राज ढवळे यांनी व्यक्त केली.

प्रकरण

दिलीप ढवळे यांनी सुद्धा अन्वय नाईक यांच्याप्रमाणेच आत्महत्या केली आहे. त्यांच्या मृत्युला जबाबदार असणाऱ्या संबधित लोकांची नावे चिठ्ठी मध्ये लिहिली होती. त्याच्या नावावर तेरणा कारखान्याने वसंतदादा बँकेकडून ३ लाख कर्ज उचलले होते, ते फेडण्याची हमी तेरणा कारखान्याने लेखी आणि ओमराजेंनी तोंडी दिली होती. दिलीप ढवळे यांनी केलेल्या कामाचे तेरणा कारखान्याकडे ३.२५ लाख रुपये येणे होते ज्यातून त्यांनी त्याचे पूर्ण कर्ज परतफेड करायला पाहिजे होती. पण, तेरणाने फक्त १ लाख ३५ हजार वसंतदादा बँकेला दिले आणि उर्वरित रक्कम भरली नाही म्हणून दिलीप ढवळे यांच्या शेतीचा लिलाव काढला.

ज्या वसंतदादा बँकेने दीड लाख रुपये साठी दिलीप ढवळे यांच्या शेताचा लिलाव काढला, त्याच बँकेचे चेअरमन विजयकुमार दंडनाईक यांच्या जयलक्ष्मी कारखान्याकडे सुद्धा दिलीप ढवळे यांचे तीन लाख रुपये २०१२ पासून येणे बाकी आहेत. ते सुद्धा त्यांनी दिले नाहीत किंवा त्याच्या कर्ज खात्यात जमा केले नाहीत. हे सगळं प्रकाशासारखे स्वच्छ दिसत असताना, सरकारच्या मात्र डोक्यात उजेड का पडत नाही ? असा सवाल ढवळे कुटुंबियाने केला.

५२ जणांवर गुन्हा

कट कारस्थान करून शेतकर्‍याची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओम राजेनिंबाळकर यांना जबाबदार धरण्यात आले आहे. ओमराजे निंबाळकर यांच्यासह ५२ जणांवर फसवणूक व शेतकर्‍यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात सप्टेंबर २०१९ मध्ये गुन्हा नोंद केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER