यंत्रमागधारकाना व्याजात सूट द्या : राजू शेट्टी

Raju Shetty

कोल्हापूर : यत्रमागधारक, वायडिंग, सायझिंग, प्रोसेस, अ‍ॅटोलूम या वस्त्रोद्योगातील घटकांना व्याज दराच्या सवलत योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी सहकारी बँकांना आदेश करण्यात यावेत, अशी मागणी माजी खासदार राजू शेटटी यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे मंगळवारी केली.

कोविड १९ च्या आपत्तीच्या काळात संचारबंदी, लॉकडाऊनचे आदेश देणेत आले. यामुळे सर्व उद्योगधंदे, व्यापार जिथल्या तिथे ठप्प झाले. पॉवरलुमच्या चक्रावर चालणाऱ्या वस्त्रनगरीची जनता हतबल झाली. यात पॉवरलुमधारकांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले व अजूनही होत आहे.

गेल्या काही वर्षापासून मंदी, महागाईमुळे पॉवरलुम उद्योग मेटाकुटीस आला असतानाच या कोरोनाने धंद्याची व उद्योजकांची अक्षरश: वाट लावली आहे. लॉकडाऊनच्या काळात सरकारने उद्योगाला मदत म्हणून बँक कर्जांचे ६ महिन्यांचे हप्ते न भरण्याचा शासन निर्णय (जीआर) केला. लघु उद्योग सक्षमीकरण व विस्तारीकरणासाठी शासन कमीतकमी व्याज दराने कर्ज पुरवठा करीत असते. सध्या दुग्ध व इतर उद्योगाला ११.२५ दराने कर्ज दिले जात होते. सद्यपरिस्थितीत बँकांनी व्याज दर कमी करून ८.२५% व्याज दर करून उद्योगाला आधार दिला आहे. वस्त्रोद्योग हा ही लघुउद्योगच आहे. शेतीबरोबर सर्वात जास्त रोजगार देणारा, विविध करांतून शासनाला हजारो करोडोंचा महसूल देणारा व निर्यातीतून मोठ्या प्रमाणात परदेशी चलन मिळवून देणाऱ्या या लघु उद्योगाला आता कमीतकमी व्याज दराने कर्ज पुरवठा करणेची गरज आहे. असे या निवेदनात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER