‘तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ’, एकनाथ खडसेंचे सूचक विधान

Eknath Khadse

जळगाव : आपल्या पक्षांतरा संदर्भात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपचा विषय जुना झाला असून आता तीन-चार दिवसात आपण मोठी बातमी देऊ,असे सूचक विधान भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी जळगाव येथे केले. भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत ऑनलाइन सहभागी झाल्यानंतर खडसे यांनी पत्रकारांशी चर्चा करताना हे विधान केले. त्यामुळे त्यांच्या पक्षांतरणाबाबत आणखीनच संभ्रम निर्माण झाला आहे.

पक्षातील विविध आघाड्यांवर सातत्याने डावलले जात असल्याने माजी मंत्री एकनाथ खडसे हे नाराज असून याविषयी त्यांनी अनेक वेळा उघड भाष्य केले आहे. त्यानंतर मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी महिनाभरात आपण निर्णय घेणार असून दुसऱ्या पक्षात केवळ काय पद मिळते याची प्रतीक्षा आहे, असा संवाद असलेली ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. ही ऑडिओ क्लीप व्हायरल होताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपची (BJP) ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत एकनाथ खडसे हे आपल्या जळगावात येथील निवासस्थानातून सहभागी झाले होते.

या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय संघटक प्रमुख संतोष कुमार, केंद्रीय मंत्री सतीश गंगवार, विजय पुरानिक, सुधीर मनगुंटीवार आदी नेते सहभागी झाले होते. या बैठकीत पक्ष संघटन, विविध राजकीय घडामोडी व इतर विषयांवर चर्चा झाली.

या बैठकीमध्ये काय चर्चा झाली याविषयी माहिती देणे खडसे यांनी टाळले. तसेच कार्यकर्ता व खडसे यांच्यातील संवादाच्या व्हायरल झालेल्या क्लिप बद्दल विचारले असता तो विषय आता जुना झाला असून तीन-चार दिवसात मोठी बातमी देतो, असे सांगून बैठकीनंतरही समाधान झाले नसल्याचे संकेत खडसे यांनी दिले.

दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना डावलल्यामुळे आता ते लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाबाबत आता जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने खडसे यांना पक्षात घेण्यासाठी काही अटी टाकल्याची चर्चा होती. मात्र, पक्षाध्यक्ष शरद पवारांकडून अशा कोणत्याही अटी टाकण्यात आल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे खडसे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित मानला जात आहे. पुढच्या महिन्यात त्यांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे. याबाबतचे वृत्त सरकारनामाने प्रकाशित केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER