लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या

नातू सचिन साठे यांनी केली मागणी

Annabhau

औरंंगाबाद :- मातंग समाजावर वाढत्या अन्याय-अत्याचाराला आळा घालण्यात यावा. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जन्मभूमी वाटेगाव येथे त्यांचे स्मारक उभारण्यात येऊन त्यांच्या कार्याचा भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात यावा अशी मागणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नातू तथा मानवहित लोकशाहीर पार्टीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी पत्रकार परिषदेत केली.

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जन्मभूमी वाटेगाव,त्यांची कर्मभुमी मुंबई आणि जिथे त्यांच्या अस्थी आहेत त्या बोदेगाव येथे स्मारक उभारण्यात यावे. तसेच क्रांतिगुरू लहुजी साळवे यांचे पुण्यातील संगमवाडी येथे स्मारक उभारावे. अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला शंभर कोटी रुपयांचे अनुदान देण्यात यावे. बार्टी अंतर्गत राज्यातील मातंग समाजातील युवकांसाठी युपीएससी-एमपीएससी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात यावे, मातंग समाजाच्या ताब्यातील गायरान जमिनीचे पट्टे त्यांच्या नावावर करण्यात यावे, क्रांतिगुरू लहुजी अभ्यास आयोगाच्या शिफारशींची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी आदी मागण्या त्यांनी या पत्रकार परिषदेत केल्या. तसेच या मागण्यासंदर्भात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा केल्याचे सांगून त्यांनी याविषयी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही त्यांनी सांगितले.

मातंग समाजाच्या मागण्यांसंदर्भात समाजात पोचण्यासाठी व त्यांच्यात जागृती करण्यासाठी आपण दौऱ्याचे आयोजन केल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला मानवहित लोकशाही पार्टीचे सचिव गणेश भगत,वाटेगाव येथील मानवहित फाउंडेशनचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत कारके,आर.बी.साठे,टी. एन. कांबळे आदीची प्रमुख उपस्थिती होती