… ‘महाज्योती’ लाही स्वायत्तता द्या – ओबीसी नेत्यांची मागणी

Vijay Vadettiwar

नागपूर : मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थे (सारथी) ला पुन्हा स्वायत्तता देण्यात आल्यानंतर ओबीसी नेत्यांनी – ‘महाज्योती’ लाही स्वायत्तता देण्याची मागणी केली आहे. ओबीसी समाजाच्या लोकसंख्येनुसार या संस्थेला निधी मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली. राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी या मागणीचे समर्थन केले आहे.

वडेट्टीवार म्हणाले – ओबीसी समाजासाठीच्या ‘महाज्योती’ संस्थेला स्वायत्तता देण्याची मागणी योग्य आहे. राज्य सरकारने ओबीसी नेत्यांचा असंतोष लक्षात घेतला पाहिजे. ‘सारथी’प्रमाणे ‘महाज्योती’लाही स्वायत्तता देणे आवश्यक आहे. त्यासाठी मी प्रयत्न करेन. आता राज्य सरकार यावर काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापला आहे. त्यात मराठा समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘सारथी’च्या स्वायत्ततेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. छत्रपती संभाजीराजे यांनी या मुद्द्यावरून महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरले होते. ‘सारथी’चे पंख छाटण्याचा प्रयत्न होतो, असा आरोप त्यांनी केला होता.

यानंतर काही दिवसांपूर्वीच ‘सारथी’ला पुन्हा स्वायत्तता बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे ‘सारथी’ला संचालक मंडळाच्या मान्यतेने विविध उपक्रम व कल्याणकारी योजना राबविता येणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे संस्थेच्या कामकाजाला गती मिळणार आहे. कल्याणकारी योजनांबाबत निश्चित करण्यात आलेल्या आर्थिक निकष व प्रशासकीय पद्धत याचा विचार करुन संचालक मंडळ आपल्या स्तरावर उचित निर्णय घेऊ शकेल. त्यामुळे सारथीच्या व्यवस्थापकीय संचालकांना संबंधित प्रशासकीय विभागाकडून पूर्वपरवानगी घेण्याची गरज भासणार नाही.

काही दिवसांपूर्वीच ‘सारथी’ची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अर्थ व नियोजन खात्याकडे देण्यात आली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्र्यांनी ‘सारथी’च्या अडचणी सोडविण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू करून, संस्थेसाठी निधीही उपलब्ध करून दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER