शेतकऱ्यांना डिव्हिडंडसाठी मंजूरीचे अधिकार संचालक मंडळाला द्या : आ.ऋतुराज पाटील यांची सहकारमंत्र्यांकडे मागणी

Ruturaj Patil

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या सभा झाल्या नसल्याने डिव्हिडंड आणि रिबेट रकमेला मंजुरी देताना तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. याचा विचार करून यंदा ही मंजुरी देण्याचे अधिकार त्या त्या संस्थेच्या संचालक मंडळाला द्यावेत. दसरा -दिवाळीच्या तोंडावर शेतकरी सभासदांना वेळेवर ही रक्कम मिळावी,यासाठी याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.

याबाबतचे निवेदन आ.पाटील यांनी सहकारमंत्री यांना पाठवुन त्यांच्याशी फोनवर चर्चा केली. या मागणी बाबत सकारात्मक निर्णय घेऊन शेतकरी सभासदांना दिलासा देऊ, असे आश्वासन बाळासाहेब पाटील यांनी आ.पाटील यांना यावेळी दिले. याबाबत दिलेल्या निवेदनात आ.पाटील यांनी म्हटले आहे की, राज्यातील अनेक सहकारी संस्थांच्या संचालक मंडळांना शासनाने मुदतवाढ दिली आहे. सेवा संस्था, दूध संस्था, पाणीपुरवठा संस्था यासारख्या सर्व सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी जुलै, ऑगस्ट महिन्यात होतात. या सभेत संस्थेने सभासदांना प्रस्तावित केलेला वार्षिक लाभांश (डिव्हिडंड) व रिबेटचा विषय मंजुर करुन घेतला जातो.

कोविडमुळे शासनाने दि.23 जुलै 2020 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. अनेक संस्थांच्या सभा झालेल्या नाहीत. त्यामुळे लाभांश व रिबेट ला मंजुरी घेता आलेली नाही. सभासदांना दसरा, दिवाळी च्या पार्श्वभूमीवर ही रक्कम मिळणे अडचणीचे झाले आहे. अगोदर कोविड मुळे अर्थचक्र कोलमडून गेलेल्या सभासदांना लाभांश व रिबेट वेळेत मिळाला नाही, तर त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे., असेे निवेदनात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER