कंगनाचे ऑफिस तोडू शकता, हिंमत नाही; गीता फोगाटचा ठाकरे सरकारला टोमणा

Kangana Ranaut-Thackeray govt

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यात सुरू असलेल्या वादात काल (९ सप्टेंबर) मुंबई महापालिकेने (BMC) तिचे ‘मणिकर्णिका’चे ऑफिस तोडले. मनपामध्ये शिवसेनेची सत्ता आहे. यावर भारताची कुस्तीपटू गीता फोगाट हिने कंगनाला पाठिंबा देताना ठाकरे सरकारला टोमणा मारला – तुम्ही कंगनाचे ऑफिस तोडू शकता, हिंमत नाही.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रत्युत्तर देताना कंगना रणौत हिने मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते, असे म्हटले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी कंगनाबाबत धमकी आणि आक्षेपार्ह भाषा वापरल्याने हा वाद स्फोटक होत गेला. त्याची परिणती काल मुंबई मनपाने कंगनाच्या चित्रपटनिर्मिती संस्थेचे ऑफिस तोडण्यात झाली.

यानंतर कंगनाने सरळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले. त्यानंतर गीता फोगाट हिने कंगनाच्या समर्थनात ट्विट केले – “(सध्याच्या महाराष्ट्रातील घडामोडी पाहता) ज्याची सत्ता, त्याची हुकूमत चालणार असे चित्र दिसत आहे! असो…. (तुम्ही) कंगनाचे ऑफिस तोडू शकता पण तिची हिंमत तोडू शकत नाही !”

काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनीही या कारवाईवर टीका केली – “सरकारमध्ये बसून आपण अशी कामं करू शकत नाही. यामुळे अतिशय चुकीचा संदेश जात आहे. ती (कंगना) भाजपच्या संपर्कात असू शकते. ती भाजपच्या सांगण्यावरूनच हे सर्व करत असेल. परंतु एक राजकीय पक्ष आणि तोही सत्ताधारी पक्ष अशा जाळ्यात अलगद अडकत आहे हे पाहून मी शांत बसू शकत नाही. जे घडते आहे ते चूक वाटते. ”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER