‘फोटो राहू द्या, तुमच्या अडचणी असतील तर सांगा’

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत गेले की चाहते त्यांना गराडा घालतात. त्यांच्यासोबत फोटो काढण्यात बारामतीकरांना परमोच्च आनंद वाटत असतो. असाच एक प्रसंग बारामतीच्या बसस्टॉपवरचा. बारामतीच्या बसस्थानकावर अजित पवारांना पाहताच, काही विद्यार्थिनींनी अजितदादांना फोटोसाठी आग्रह केला. पण, अजित पवार यांनी ‘फोटो राहू द्या, तुमच्या अडचणी असतील तर सांगा’, असं म्हणत त्या विद्यार्थिनींशी संवाद साधला.

आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये प्रत्येक कामाबाबत लागलीच निर्णयही घेतले. अजित पवारांनी त्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या आणि लागलीच त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. अजित पवार तात्काळ निर्णय घेण्यासाठी तत्पर नेता तसेच, स्पष्टवक्ते म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. त्यांची ही झलक नेहमीच दिसत असते.

फडणवीसांच्या आणखी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अजित पवार यांचा ब्रेक

बारामती शहरातील पोलीस वसाहत, बसस्थानक, एसटी कर्मचारी वसाहत, पंचायत समिती, एसटी कार्यशाळा आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांची पाहणी करत अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नवीन वसाहत उभारणी, एसटी कर्मचारी वसाहत दुरुस्ती, पंचायत समिती नूतन इमारत बांधकाम, एसटी कार्यशाळा दुरुस्ती, वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसराचे सुशोभीकरण अशा विविध कामांबाबत अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.