बालिका , तू मुग्ध कलिका ! तू दुहिता !

Mansi

सकाळी सकाळी मोबाईल बघितला. त्यावरचा मेसेज होता,” आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!” अरेच्या ! आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी जी “नकुशी” समजली जात होती ,तिच्या अस्तित्वाचे चक्क स्वागत होते ते ? मनातल्या मनात यातील असंख्य पीडित जखमी मनाच्या, उकिरड्यावर फेकल्या गेलेल्या बालिका वाकुल्या दाखवत उग्र हसत आहेत सगळ्या बाजूंनी, असं मला वाटायला लागलं. पण पोस्ट पुढे वाचू लागले, बालिकांच्या अधिकारांचे संरक्षण व सशक्तीकरण याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने साजऱ्या केल्या जाणाऱ्या बालिका दिनाच्या त्या शुभेच्छा होत्या. त्यामुळे हेतू बघून मन थोडं शांत झालं.

खरंतर अगदी सुशिक्षित म्हणवल्या जाणाऱ्या कुटुंबातही, केवळ मुलासाठी “कुलदीपक” हवा म्हणून फक्त मुलाची वाट पहात चार चार मुलींना जन्माला घातले गेलेले बघितले आहे. केवळ कुलदीपक हवा म्हणून आणि दोन मुलींच्या पाठीवर मुलगा हवा म्हणून नवऱ्याचे लग्न लावून देण्याचा वेडेपणा करणारी एखादी अशिक्षित त्यागमुर्ती स्त्रीही बघितली आहे आणि दोन्ही मुले डॉक्टर असूनही मानसिक आजारी आईकडे लक्ष न देणाऱ्या कुटुंबातील वडिलांची हतबलतेच्या कहाण्या सुद्धा ऐकल्या आहेत. याउलट स्वसामर्थ्यावर, स्वाभिमानाने आपल्या संसारात स्वतःला भाऊ नसल्याने आई-वडिलांचा पूर्ण सांभाळ करणार्या, खंबीरपणे उभ्या राहिलेल्या कन्यकाही भरपूर आहेत.

पण आपल्या सत्य, अहिंसा मानणाऱ्या देशात सर्वव्यापी हिंसा बघायला मिळते आणि तीही फार भेसूर स्वरूपात! आणि ही जात, धर्म, पंथ, देश ,प्रदेश, भाषा, लिंग यातील विद्वेषातून उद्भवते. आपण मागे बघितले होते त्याप्रमाणे युद्ध असो कुठलेही संकट असो वा हिंसा त्यात भरडली जाते ती केवळ स्त्री! तिची हिंसा ! ती केवळ शारीरिक नाही तर मानसिक आणि भावनिक देखील.

ही बातमी पण वाचा : प्रिय सखी, आता तरी जागी हो !

तिच्या अस्तित्वाला पहिला सुरूंग लागतो तोच मुळी आईच्या गर्भापासून! अवैध गर्भपातासाठी किती ही योजना केल्या, कायदे केलेत तरी या घटना घडतच राहतात आणि त्यात हात असल्याचं समोर येतं ते सुशिक्षित म्हणवल्या जाणाऱ्यायांचे! विज्ञानात कितीही शिकवले जात असलं, मुलगी की मुलगा जन्माला येणं हे सर्वस्वी पुरुषावर अवलंबून असतं. तरीदेखील तिला नाकरणारा तोच असतो, आणि दुर्दैवाने म्हणजे स्त्रियांनासुद्धा कुठेतरी मनात आपल्या वंशाला दिवा वगैरे जेव्हा वाटताना दिसतो तेव्हा हद्द वाटते.

मग जीवनावर च्या प्रत्येक टप्प्यावर च्या तिच्या गोष्टी “नकोशा” वाटतात. सृजनशक्ती जेव्हा बहरायला सुरुवात होते तेव्हापासून येणारी अनाठाई बंधन, तिच्या आरोग्यविषयक गोष्टींचा मातृत्वाच्या बैठकीचा, विचार अपवित्र वगैरे असा करणे. अशावेळी विचारावंसं वाटतं की आपण खरंच सुशिक्षित आहोत ? आदिवासी जमातींमध्ये आपल्या वस्त्यांपासून दूर झोपड्या बांधून मुली, स्त्रियांना पाळीच्या दिवसात ठेवले जातात. तेथे कणभरही स्वच्छता नसते, अतिशय गंभीर परिस्थिती असते. ज्यावेळी नितांत स्वच्छता हवी त्यासाठी ही सोय? पण बोलून चालून ते तर बिचारे अशिक्षित त्यांना काय म्हणावं ?

याशिवाय कंजारभाट सारख्या काही समाजामध्ये लग्न झाल्यावर तिच्या पावित्र्याची परीक्षा घेण्याचा जो अघोरी प्रकार आहे, आणि त्यानंतरच तिचा स्वीकार केला जातो तो किती लांच्छनास्पद आहे. हे सगळं त्या मुलीच्या बाबतीत का ? मुलांनी काय काहीही केलं तरी चालतं ? यामागे खरंतर शास्त्रीय माहिती पण उपलब्ध आहे. अशा रूढी-परंपरा पाहतांना आवश्यक असणारी शास्त्रीय माहिती आपण समाजापर्यंत केव्हा पोहोचणार ? ह्यात मोठी जबाबदारी सुशिक्षित लोकांवर आहे.

ही बातमी पण वाचा : समथिंग स्पेशल !

वेळोवेळी अगदी पित्याकडून होणारे अत्याचार सहन करणं म्हणजे तर सगळ्या वरचा कळसच ! एखादी तान्ही मुलगी, किंवा तीन वर्षाची अंगणात खेळणारी बालिका अत्याचाराला बळी पडते तेव्हा हृदय पिळवटून जाते. विद्या मंदिर ज्याला आपण म्हणतो, या ठिकाणी होणारे अत्याचार आणि, अगदी घरातल्या जवळच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या अत्याचारा बाबत ऐकिवात येत तेव्हा वाटतं. कुणा कुणाला भ्यायचं मग? अगदी भावाचा मित्र? येणारा नातेवाईक ? कुणीही यावं आणि घाला घालावा?

काही वर्षांपूर्वी हुंड्याच्या प्रथे मुळे मुलगी झाली की जड वाटायचे ,हुंडाबळी ही एक समस्या होती. पण चळवळींमुळे झालेला हुंडाविरोधी कायदा आणि मुली शिकून कमवायला लागल्या त्यामुळे ही प्रथा बरीच कमी झाली. जपून राहा, संभाळून रहा ,काळजी घे या सगळ्या सूचना असतात फक्त तिला ? मुलांची तशी काळजी फारशी केली जात नाही. पण खरं ना ! या सूचनांमध्ये ही चूक काही नाही, कारण परिस्थिती तशी आहे आणि हे कटू असले तरी वास्तव आहे. आणि आईची माया म्हणूनच ती आपल्या लाडकीला जपत असते. पण हा उपाय नाही ना !

त्याला उपाय आहे मुलांचा दृष्टिकोन बदलण्याचा ! स्त्रीकडे, मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन ! याबाबत नैसर्गिक आकर्षण समजू शकतो. पण त्यात जी मालकी हक्काची भावना येते आणि माझ्यात शक्ती आहे, तिचा उपयोग मला जे (म्हणजे जी) हवं ते मिळवण्यासाठी मी करीन या विचारांना बदलण्याची गरज आहे. नकार पचवता येणं ही गोष्ट खूप गरजेची आहे. एकूणच दोन्ही बाजूंनी नकार देण्याची पद्धत असते, तीही बरेचदा फार चुकीची ऐकायला मिळते.

जे आवडतं ते मिळवण्याचा अट्टाहास का ? “तुम मेरी नही तो किसी की भी नही !”या प्रवृत्तीतून एक तर्फी प्रेमातून तोंडावर ऍसिड घेण्यासारखे गुन्हे होताना दिसतात. नारी समत मंच, युक्रांद, नवनिर्माण मासूम अशा अनेक संघटनांनी याविषयी आवाज उठवला. यासंदर्भातील एका परिषदेत अभिनेता आमिर खान यांन एक प्रगल्भ आवाहन केलं होतं असं स्व. विद्या बाळ यांनी सांगितल्या चे वाचनात आले होते. त्याने मुलांना सांगितलं, “शाळेत मीही एक दोन मुलींना आय लव यू म्हटलं. तेव्हा त्यांनी मला नकार दिला होता. त्यावेळी मला वाईट वाटलं. पण मला त्यांचा राग आला नाही. जिच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीचा खून आपण कसा करू शकतो?”

बालिका दिन जरी आंतरराष्ट्रीय म्हणून साजरे केले गेले तरी त्यासाठीच, या कामाची रुजवात आपल्या प्रत्येक कुटुंबातून व्हायला पाहिजे. मग घरातली कामे मुलींची ! तू काय घरात मुलीसारखं काम करतो ही मानसिकता बदलणं हे आपलं पहिलं ध्येय असायला पाहिजे. मुलांशीही सगळ्या या गोष्टींवर मोकळ बोलले गेले पाहिजे.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे आत्ता बाबा या भूमिकेत असणार यांचा रोल यात सगळ्यात महत्त्वाचा आहे. घरातले पुरुष जर आईला बहिणीला आदराने वागवत असतील तर ते बघून मुले पुढे तसेच करतील. हा आदर घराघरातून शिकवला गेला पाहिजे.

दोन-तीन दिवसांपूर्वी आमच्याकडे एक पाहुणे आले होते. बरोबर त्यांची मुलगी पण होती. चहापाणी आटोपल्यावर माझ्या मुलाने पटपट कपबशा आत नेऊन ठेवल्या. तेव्हा त्यांनी मुलीला जरा ओरडून पटकन उठवले. इथपर्यंत ठीक ! तिला सुचलं नव्हतं ते सुचवलं. पण पुढे म्हणाले, “अरे राहू दे. त्याला कशाला एवढी कामे सांगता ?” ही प्रवृत्ती बदलायला पाहिजे.मी सांगितले, “आमच्याकडे हे आणि मुले मदत करतात.आता काळ बदलला आहे,त्याप्रमाणे बदलायलाच हवे.मुल आणि मुली आपापले काम स्वतःची, स्वतःला करता यायलाच पाहिजे.”

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सचा एक अभ्यास सांगतो, की देशाच्या मानसिकतेत काही वर्षात सकारात्मक बदल झाले आहेत. भारतीय कुटुंबात मुलगाच हवा हा अट्टाहास कमी झाल्याचे चित्र आहे. मुलगाच हवा असा अट्टाहास असणाऱ्या हरियाणा, पंजाब या राज्यात ही मानसिकता बदलली आहे. एकाच मुलीवर कुटुंब नियोजन करणाऱ्यांची संख्या तीन दशकांमध्ये दुप्पट झाली असून अशी कुटुंब उच्चशिक्षित आणि आर्थिक दृष्ट्या संपन्न आहेत. असे सर्वेक्षण सांगते. परंतु हेही नसे थोडके ! फक्त हा बदल आता ग्रामीण भागातून आणि अशिक्षित, गरीब कुटुंबांमधून झाला तर त्याला खऱ्या अर्थाने आपण बदल म्हणू शकतो.

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER