गिरीश महाजनांच्या गाडीला अपघात, महाजनांमुळे जखमीला मिळाले वेळेवर उपचार

Girish Mahajan

जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे (BJP) नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात यामध्ये एक वैद्यकीय कर्मचारी जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवानं गिरीश महाजन यांना काहीही झालेलं नाही. ते सुखरुप आहेत. रविवारी दुपारच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील लोहारा-वरखेडे रस्त्यावर (Lohara-Varkhede road) हा अपघात झाला.

मिळालेली माहिती अशी की, भाजपचे आमदार गिरीश महाजन हे मुंबई येथील कामकाज आटोपून जामनेर येथे आपल्या घराकडे येत होते. पाचोरा तालुक्यातील लोहारा–वरखेडे रस्त्यावर अचानक त्यांच्या वाहनाला मागून एका दुचाकीस्वारानं जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी स्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी जखमीला मदत करण्यात कोणी पुढे येत नव्हतं. तात्काळ गिरीश महाजन यांनी गाडी बाजूला घेत दुचाकीस्वाराच्या मदतीसाठी सरसावले. गिरीश महाजनांनी या जखमी तरुणाला स्वत:च्या गाडीत बसवून पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. हा जखमी तरुन आरोग्य विभागातील कर्मचारी असून वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कामाला आहे.

दरम्यान, लोहारा–वरखेडी हा रास्ता प्रचंड खराब झाला आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. खड्ड्यांमुळे आमदार गिरीश महाजन यांचे वाहन हळू चालत होते. मात्र, रस्त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्याला वाहन चालवण्यात अडथळे आल्यामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटून तो आमदार महाजन यांच्या वाहनावर मागच्या बाजूनं आदळला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER