खडसेंच्या पक्षांतरानंतर गिरीश महाजन सक्रिय; रक्षा खडसेंच्या गैरहजेरीवर दिली प्रतिक्रिया

girish-mahajan

जळगाव :- ४० वर्षांची भाजपची साथ सोडून अखेर एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) राष्ट्रवादी कॉंंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकारणावर  परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पक्षांतरानंतर खडसेसुद्धा जोमाने राष्ट्रवादीच्या कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा भाजपाच्या कोअर कमिटीच्यावतीने आज दुपारी पक्ष कार्यालयात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत पक्ष संघटन मजबुतीच्या दृष्टीने वरिष्ठ नेत्यांकडून चाचपणी करण्यात आली. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या स्नुषा भाजपा खासदार रक्षा खडसे या बैठकीला अनुपस्थित होत्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यावर भाजपा आमदार गिरीश महाजनांना विचारले असता ते म्हणाले, रक्षा खडसे काल रात्री पक्षाच्या बैठकीसाठी दिल्लीला गेल्या आहेत. त्या संदर्भात त्यांनी वरिष्ठ नेत्यांना पूर्वकल्पनादेखील दिली होती. पक्षाची परवानगी घेऊनच त्या दिल्लीला गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थिती संदर्भात तर्कवितर्क लढवणे चुकीचे असल्याचे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सांगितले.

खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसणार असल्यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याबाबत भूमिका मांडताना गिरीश महाजन म्हणाले की, भाजपा हा पक्ष विचारांवर चालणारा आहे. हा व्यक्तिकेंद्रित पक्ष नाही. त्यामुळे पक्षातील कोणी एक जण गेल्याने त्याचा काहीएक परिणाम पक्ष  संघटनेवर होत नसतो. एकनाथ खडसे गेल्याने भाजपाला कोणत्याही प्रकारचा फटका बसणार नाही. याउलट आगामी काळात पक्ष संघटन मजबूत करण्यासंदर्भात चाचपणी सुरू असल्याचे गिरीश महाजन म्हणाले.

या बैठकीनंतर माजी मंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीच्या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, आजची कोअर कमिटीची बैठक ही नियमित स्वरूपाची होती. महाराष्ट्रात फक्त जळगाव जिल्ह्यात पक्षाची कार्यकारिणी गठित करण्याचे काम राहिले आहे. ही कार्यकारिणी गठित करण्यापूर्वी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे, त्यांचे मत जाणून घेण्यासाठी ही बैठक घेतली. त्यानंतर आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय आढावा घेऊन कार्यकारिणी जाहीर होणार आहे. पक्ष संघटन मजबुतीसाठी चाचपणी सुरू असल्याचे यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : एकनाथ खडसेंना भाजपमध्ये पश्चाताप झाल्याने ते राष्ट्रवादीत आले; राष्ट्रवादीचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER