गिरीजाला व्हायचंय खलनायिका

Girija Prabhu

नायिकेने केलेली खीर बिघडवणारी, दाराला कान लावून नायक आणि नायिकेचं बोलणं ऐकून कट रचणारी, करोडोंची उलाढाल करणाऱ्या फॅमिली बिझनेसमधील महत्त्वाची फाइल गायब करणारी एखादी खलनायिका मालिकेत नसेल तर काय मज्जा बुवा. आनंदीआनंद असलेल्या कथेत मीठाचा खडा पाडणारं कुचकं पात्र असल्याशिवाय मालिकेच्या पुढच्या भाग रंगत नाही. म्हणूनच मालिकेत नायिकेसोबतच एक खलनायिका असतेच. मग ती जाऊ असेल, नणंद असेल, वहिनी असेल सासू असेल किंवा मुक्कामाला आलेली आत्या, मावशी, मामी. मालिकेतील बॅड गर्लची डिमांड वाढते. नायिकेच्या सोज्वळतेपेक्षा सतत कारस्थानं करणाऱ्या या खलनायिका भाव खाऊन जातात. खलनायिकेची हीच लोकप्रियता अभिनेत्री गिरीजा प्रभूला (Girija Prabhu) अनुभवायची आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत नायिका म्हणून झळकत असलेल्या गिरीजाची ही मुख्य भूमिकेतील पहिलीच मालिका असल्याने ती खुश आहेच पण तिच्या मनातून खलनायिका साकारण्याचे स्वप्न काही जात नाहीय.

काय झालं कळंना या फारशा न चाललेल्या सिनेमासह काही मालिकांमध्ये छोटे रोल करणाऱ्या गिरीजाची निवड सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील साध्या सरळ गौरीच्या भूमिकेसाठी झाली आहे. पहिल्या आठवड्यातच या मालिकेने पकड घेतलीय. गुरूदेव दत्त मालिकेत दत्तगुरू साकारलेल्या मंदार जाधव या मालिकेत लंडन रिटर्न जयदीप वठवत आहे. तर दहा वर्षांनी अभिनेत्री वर्षा उसगावकर या मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर आल्या आहेत. घरकाम करणारी मुलगी आणि त्याच घरातील उच्चशिक्षित मुलगा यांची लहानपणाची मैत्री, तारूण्यातील प्रेम आणि लग्न यावर ही मालिका बेतली आहे. सगळं छान असेल अशी मालिका असूच शकत नाही, या नियमाप्रमाणे या मालिकेतही शिर्केपाटील यांच्या घरातील वहिनीने खलनायिका रंगवली आहे. यामध्ये माधवी निमकरचा खलनायकी अंदाज पहायला मिळणार आहे. याच विषयी झालेल्या गप्पांमध्ये गिरीजाने तिला खलनायिका करायची इच्छा बोलून दाखवली आणि तिच्या सहकारी कलाकारांनी माधवीच्या भूमिकेतून खलनायिकेचे धडे गिरवण्याचा गंमतीचा सल्लाही दिलाय.

गिरीजाला खलनायिका खुणावतेय कारण आजवर अनेक मालिका लोकप्रिय करण्यात या पात्राचा मोठा वाटा आहे असं तिला वाटतं. गिरीजाचं म्हणणं आहेच खरं. तुझ्यात जीव रंगला मालिकेतील धनश्रीचा फॅनक्लब वाढवण्यात नंदिनीच्या भूमिकेचीच कमाल होती. सध्या सुरू असलेल्या राजा राणीची गं जोडी मालिकेतील राजश्री वहिनी फक्त डोळ्यांनी कारवाया करत फेमस झालीय. हे मन बावरेतील सानवीनेही तत्ववादी कुटुंबाच्या आर्थिक नाड्या आवळल्या तरीही तिच्यासाठी मालिका बघणारा एक प्रेक्षकवर्ग आहे. अग्गंबाई सासूबाईतील शेजारीण प्रज्ञाला आसावरीच्या घरात फूट पाडूनही चाहत्यांचं प्रेम मिळतं. आता गिरीजाच्या नव्या मालिकेत गौरी आणि जयदीपचं नातं खलनायिका असलेल्या वहिनीच्या डोळ्यात खुपणार आहेच. त्यामुळे मालिकेची तिखट बाजू सांभाळणारी खलनायिका कधीतरी करायला मिळावी म्हणून गिरीजाही तयारीत आहे.

श्रावण क्वीन या सौंदर्य स्पर्धेत विजेती झाल्यानंतर गिरीजाने अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी खास तयारी केली. पण अभिनेत्रीच व्हायचं हे मात्र गिरीजाने लहानपणीच ठरवलं होतं. गिरीजा मूळची गोव्याची असली तरी तिचं सगळं शिक्षण पुण्यातच झालं. शाळेत असताना उन्हाळी सुट्टीत अभिनय शिबिरात सहभागी झाल्यानंतर तिचा या कलेत रस वाढला. अभिनयात संवाद कौशल्य, आवाजातील चढउतार याला असलेलं महत्त्व ओळखून गिरीजाने डबिंगचा कोर्सही केला. टाइम प्लीज या सिनेमात तिला एक छोटा रोल मिळाला आणि त्यासाठी गिरीजाला ३०० रूपये मानधन मिळाले होते. अभिनयासाठी तिला मिळालेली ही तिची पहिली कमाई. चॉकलेट आणि आइस्क्रिम खाण्यासाठी काहीही करू शकणाऱ्या गिरीजाला भटकायलाही खूप आवडतं. समुद्रकिनारा हा तिचा फेव्हरेट स्पॉट आहे.

साधी सरळ, इतरांच्या सुखात आनंद मानणाऱ्या नायिकेपासून गिरीजाचा मालिकेतील अभिनयाचा प्रवास सुरू झाला आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील गौरी जशी आहे तशीच मी खऱ्या आयुष्यात असल्याचं गिरीजा सांगते. सध्या तरी ती सोज्वळ गौरी साकारत असली तरी भविष्यात खलनायिका साकारण्याचं स्वप्न आहेच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER