गिरिजाला मानवले ‘सुख’

Girija la manavala sukh

जे काम मनाला आनंद देतं, जे काम आवडीचं आहे ते काम करायला मिळालं तर त्यातून मिळणारा आनंद हा केवळ चेहऱ्यावरच नव्हे तर आपल्या तब्येतीवरदेखील दिसत असतो. सुख म्हणजे नक्की काय असतं, हा प्रश्न मालिकेतील नायिका म्हणून विचारणाऱ्या अभिनेत्री गिरिजा प्रभू (Girija Prabhu) हिच्या बाबतीत ही गोष्ट तंतोतंत खरी झाली आहे. लॉकडाऊननंतर ही मालिका सुरू झाली. गेल्या चार महिन्यांत गिरिजाचं वजन चांगलंच वाढलं आहे. आता हे कोणी सांगितलं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण हे दस्तुरखुद्द गिरिजाचा ऑनस्क्रीन नायक मंदार जाधव (Mandar Jadhav) यानेच ही गोड तक्रार केली आहे. गेल्या काही दिवसांत गिरिजाच्या साकारत असलेल्या गौरी या पात्राला इतके अपघात झाले, तिला इतके चढ-उतार सहन करावे लागत आहेत की, वेळोवेळी तिला उचलून घरी आणावे लागत आहे. अर्थातच हे काम नायक म्हणून मंदार जाधववर येऊन पडतं आणि त्याच अनुभवातून मंदारने तक्रार केली आहे की, गेल्या चार महिन्यांत अनेकदा गौरीला उचलण्याचे काम केल्यामुळे माझ्या लक्षात आलेय की, गौरीला प्रत्यक्ष आयुष्यात आमच्या मालिकेतल्या नावाचे सुख चांगलेच मानवले आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका दिवसेंदिवस रंजक बनत प्रेक्षकांच्या मनावर पसंतीची मोहोर उमटवत आहे. या मालिकेत पहिल्यांदाच नायिकेच्या भूमिकेत दिसत असणारी गौरी म्हणजेच गिरिजा प्रभू हिनेदेखील गौरी या व्यक्तिरेखेला अभिनयाच्या माध्यमातून चांगलाच न्याय दिला आहे. तिच्या नवऱ्याची म्हणजे जयदीपची भूमिका अभिनेता मंदार जाधव साकारत आहे. मालिकेच्या कथेनुसार गौरी ही पाटील यांच्या घरातील एक आश्रित मुलगी आहे. आणि एका विचित्र परिस्थितीत जयदीप आणि गौरीचं लग्न होतं. लग्नामुळे खूश नसलेले काही सदस्य शिर्के पाटील यांच्या घरात आहेत. त्यामुळे लग्नानंतर सतत गौरीचा दुःस्वास केला जात असतो. याच अनुषंगाने मालिकेत दोन महिन्यांत अनेक वेगवेगळे सीन असे आले आहेत की, ज्यामध्ये काही कारणाने गौरी घराबाहेर जाते, कधी तिला पळवून नेलं जातं तर कधी तिचा अपघात घडवून आणला जातो. कधी तिला उपाशी ठेवलं जातं. सीन वेगवेगळे असले तरी या प्रत्येक सीनमध्ये जखमी झालेली किंवा बेशुद्ध पडलेल्या गौरीला उचलून घरी आणण्याची जबाबदारी ही तिचा नवरा म्हणजेच जयदीपवर येऊन पडते. याच गोष्टीवरून जयदीपची भूमिका करणाऱ्या मंदार जाधवला सेटवर अनेकांनी छेडले असता त्याने ही गोड कबुली दिली आहे. मंदार सांगतो, गेल्या दोन महिन्यांपूर्वी ऑनस्क्रीन आमचं लग्न झाल्यापासून अशा अनेक घटना आमच्या आयुष्यात घडल्या आहेत की, मला गिरिजाला उचलून घेण्याची वेळ आली आहे.

त्या प्रत्येक वेळेला मला असे जाणवले की, तिचं वजन हे मागच्या वेळेपेक्षा पुढच्या वेळेला वाढलेलं असतं. स्क्रीनवर तरी ते बघत असताना जाणवत नसले तरी हे फक्त मला एकट्यालाच माहीत आहे की, तिचे वजन नक्कीच वाढले आहे. त्यामुळे गिरिजाने डायट फूड खाण्यावर लक्ष दिले पाहिजे. मंदारची प्रतिक्रिया ऐकून सुरुवातीला गिरिजाही अवाक् झाली. तिलासुद्धा कळत नव्हतं की तिचं वजन वाढलं आहे; पण मंदारचा हा सल्ला तिने खिलाडूवृत्तीने घेतला असून पुढच्या वेळेला जर असा कुठला सीन असेल ज्यामध्ये तिला उचलून घेण्याची वेळ आली तर नक्कीच वजन कमी झालेले असेल, असे गिरिजाने मंदारला प्रॉमिस केले आहे. गिरिजाने यापूर्वी ‘काय झालं कळेना’ या सिनेमात काम केलं होतं. छोट्या पडद्यावरील मुख्य नायिकेच्या भूमिकेत ती पहिल्यांदाच प्रेक्षकांना दिसत आहे. सौंदर्य स्पर्धांमध्येदेखील गिरिजाने स्टेज गाजवले असून ती उत्तम कोरिओग्राफरदेखील आहे. मंदारने यापूर्वी ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेत गुरू दत्तांची भूमिका साकारली होती. त्यामुळे जयदीपची भूमिका ही त्याच्या आधीच्या भूमिकेपेक्षा खूपच वेगळी असल्याने त्याला ही भूमिका करताना खूप मजा येत असल्याचं तो नेहमी सांगतो.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या निमित्ताने मंदार आणि गिरिजा यांची केमिस्ट्रीदेखील त्यांच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. हे दोघेही सतत मालिकेतील ऑफस्क्रीन धमाल सोशल मीडियावर शेअर करत असतात. मंदारने गिरिजाचं वाढलेलं वजन त्याला कसं कळालं याचा किस्सा सोशल मीडियावर शेअर केला तेव्हा चाहत्यांनी दिलखुलास हसण्याच्या इमोजीसोबत गिरिजाला थोडं बारीक होण्याचा सल्ला दिला आहे . आता सगळ्यांचे कान मंदारच्या पुढच्या अनुभवाकडे लागलेले आहेत, ज्यामध्ये तो गिरिजाचं वजन कमी झालं आहे की नाही हे सांगेल. त्यामुळे हा मजेशीर किस्सा सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER