राजकारणाला फाटा देत गडकरींकडून पवारांना मोठी भेट, नगरच्या विकासात ठरणार मैलाचा दगड

gift to Pawar from Nitin Gadkari

अहमदनगर : केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे विकासाच्या बाबतीत राजकारण बाजूला करतात याची प्रचिती पुन्हा एकदा दिसून आली आहे. नगर जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणारा आणि नुकताच नव्याने घोषित झालेला राष्ट्रीय महामार्ग ५४८ (ड) मधील आढळगाव ते जामखेड या ६२.७७ किलोमीटरच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी ३९९.३३ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. विशेष म्हणजे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील या विषयात आर्वजून लक्ष घातले होते. तसेच गडकरींशी चर्चा करुन वाढीव निधीची मागणीही केली होती. अखेर गडकरींनी राजकारणाला फाटा देत पवारांच्या मागणीनुसार भरीव निधीची घोषणा केली.

रोहित पवार यांनी नुकतीच नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. न्हावरा-इनामगाव-काष्टी-श्रीगोंदा-जळगाव-जामखेड या राज्यमहामार्गाला नुकताच राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला असून, या मार्गातील आढळगाव ते जामखेड या ६२.७७ किलोमीटर मार्गाचे दोन लेनमध्ये चौपदरीकरण होणार आहे. या कामासाठी ३९९.३३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे मतदारसंघातील या रस्त्याचे भाग्य उजळले आहे.

प्रवासी वाहतुकीसह कारखानदारी वाहतुकीसाठीही हा मार्ग महत्वाचा ठरणार आहे. केवळ इतकेच नव्हे तर नगर-सोलापूर ५१६ (अ) या नवीन चौपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या कामात असणारे अडथळे देखील दूर होऊन या कामाची निविदा निघाली आहे. नगर सोलापूर व आढळगाव ते जामखेड हे दोन्ही राष्ट्रीय महामार्ग तालुक्याच्या व एकंदरीतच जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरणार आहेत. तालुक्यातील या रस्त्यांच्या प्रश्नासाठी आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दोनदा भेट घेऊन निवेदन दिले होते. तसेच संबंधित अधिकाऱ्यांसोबत एकदा बैठक घेऊन संबंधित कामाचा पाठपुरावा केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या विषयात आर्वजून लक्ष घातले होते. तसेच गडकरींशी चर्चा करुन वाढीव निधीची मागणीही केली होती. अखेर गडकरींनी पवारांचा शब्द राखून महामार्गाच्या कामासाठी मोठ्या निधीची तरतूद केली आहे.

नगर- सोलापूर व आढळगाव ते जामखेड रस्त्याच्या कामांसाठी मी सातत्यानं केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत होतो. काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधीची मागणी केली होती. जनेतच्या मागणीचा मान राखत त्यांनी भरीव निधी मंजूर केला. या रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होण्यास निश्चित मदत होईल, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button