राष्ट्रवादीने राखला भाजपचा मान; उपमहापौरपदाच्या शर्यतीतून माघार

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) भाजपच्या  (BJP) विनंतीला मान दिल्याने उपमहापौरपदी सत्ताधारी भाजपचे मोरवाडीचे प्रतिनिधित्व करणारे केशव घोळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकिता कदम (Nikita Kadam) यांनी उपमहापौरपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने घोळवे यांची बिनविरोध निवड शक्य झाली. मात्र, घोळवे यांना फक्त पाच महिन्यांसाठी ही संधी दिली आहे.

पक्षांतर्गत धुसफूस रोखण्यासाठी भाजपने हे पाऊल उचलल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका उपमहापौर तुषार हिंगे यांनी १४ ऑक्टोबरला तडकाफडकी उपमहापौरपदाचा राजीनामा दिल्याने निवडणूक झाली. शुक्रवारी महापालिकेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभेत निवडप्रक्रिया झाली. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. ११.१५  वाजता अर्ज माघारी घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला होता.

सभागृह नेते नामदेव ढाके, केशव घोळवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अर्ज माघार घेण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देत कदम यांनी माघार घेतली. उपमहापौरपदासाठी सोमवारी सत्ताधारी भाजपकडून केशव घोळवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पालिकेत भाजपचे बहुमत असल्याने त्याच वेळी त्यांची निवड निश्चित झाली होती; पण संख्याबळ नसल्याचे आणि कोरोनाचे कारण देत नुकत्याच झालेल्या प्रभाग समिती, विषय समिती सभापतिपदाची निवडणूक न लढविणाऱ्या विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने उपमहापौरपदाच्या निवडणुकीत उडी घेतली होती. पिंपरी गावाचे प्रतिनिधित्व करणा-या निकिता कदम यांचा अर्ज दाखल केला होता. अखेरीस त्यांनी माघार घेतल्याने घोळवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER