‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’साठी नगरसेवकांचे सहकार्य घ्या : महापौर दयाशंकर तिवारी

Mayor Dayashankar Tiwari

नागपुर : कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे. रोज कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ वाढविण्यासोबतच इतर बाबींवर तातडीने अंमल करावा लागेल. या सर्व कार्यात संपूर्ण नगरसेवकांचा सहभाग घेतला आहे. प्रशासन आणि पदाधिकारी यांच्या समन्वयातून परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे सोपे होईल, अशा सूचना महापौर दयाशंकर तिवारी यांनी केल्या. तिवारी यांनी कोरोनासंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मनपातील कोरोना नियंत्रण कक्षाला भेट दिली. त्यांनी अधिकाऱ्यांकडून उपाययोजना आणि नियोजनाबद्दलची माहिती जाणून घेतली. यावेळी उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे उपस्थित होते.

याप्रसंगी तिवारी म्हणाले की, “गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढलेली कोव्हिड रुग्णांची संख्या शहरासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत नागरिकांना नियमांचे पालन करत दैनंदिन व्यवहार सुरू करण्याची मुभा देण्यात आली. परंतु, शासन, प्रशासनाने वारंवार सांगूनही दिशानिर्देशाचे पालन करता कुचराई केली. शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर होत नसल्याचे दिसून आले. अशा व्यक्तींवर मनपा दंडात्मक कारवाई करत असले तरी, दंड हा उपाय नाही. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून नियमांचे पालन गरजेचे आहे. मात्र कुठलीही हयगय न करता आक्रमकपणे कोरोना रुग्णांची ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ करणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रक्रियेत नगरसेवकांचा सहभाग घ्या.” अशी सूचना महापौरांनी केली.

दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. महापौर म्हणाले की, “‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ वाढविण्यासोबत होम सर्व्हेच्या चमूंमध्येही वाढ करण्यात यावी. ५ ते ८ पर्यंतचे वर्ग बंद करण्यात यावे, पूर्वीसारखे महाविद्यालयाचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने घ्यावे, ज्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे, ज्या वर्गात नियम पाळल्या जात नाही, असे वर्ग बंद करण्यात यावे, मास्क न लावणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, जिथे अधिक गर्दी दिसेल, त्या प्रतिष्ठानांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, कोरोना नियंत्रण कक्षात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्यावे, ज्या परिसरातून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह येत असेल, अशा परिसरात १०० टक्के व्यक्तींची कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. आर.आर.टी. चमूंची संख्या वाढवावी, कोरोना रुग्णांचे समुपदेशन करण्यात यावे आणि नगरसेवकांच्या माध्यमातून लोकांना संपर्क करून जनजागृती करावी. आशा वर्कर आणि परिचारिकांचीही संख्या वाढवावी.” अशा सूचना महापौरांनी यावेळी केली. या सर्व मुद्यांसंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

तत्‌पूर्वी अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांनी महापौरांना कोरोना नियंत्रण कक्षामधून केल्या जाणाऱ्या कामाची माहिती दिली. नियंत्रण कक्षामधून नागरिकांना खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये असलेल्या रिक्त खाटांची माहिती मिळते, तसेच कोरोना लसीकरणासाठी ज्यांचे नाव आहे त्यांना दूरध्वनीद्वारे सूचना दिली जाते, असेही त्यांनी सांगितले. कोरोना नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५६७०२१ असा आहे. यासंदर्भात विविध माध्यमातून प्रसिद्धी केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ नरेंद्र बहिरवार, डॉ. विजय जोशी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER