आव्हाडांना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करा- फडणवीसांची मागणी

- सिव्हिल इंजिनीअरला बंगल्यावर नेऊन केली होती मारहाण

Devendra Fadnavis on Jitendra Awhad

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या खासगी बंगल्यावर ४० वर्षीय सिव्हिल इंजिनीअरला झालेल्या कथित मारहाणीचे प्रकरण तापले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आव्हाड यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. एखाद्या व्यक्तीला मंत्र्याच्या सुरक्षा रक्षकाने, मंत्र्याच्या घरी नेऊन, मंत्र्याच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे, ही अतिशय गंभीर घटना असून शासनकर्तेच अशा प्रकारे मारहाण करीत असतील, तर कायद्याचे राज्यच अस्तित्वात राहणार नाही, अशी भीती फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. सोशल मीडियाचा कुणी चुकीचा वापर केला तर तक्रार करण्याचा आपला अधिकार अबाधित आहे, असे नमूद करत आव्हाड यांच्या बंगल्यावर जो प्रकार घडला तो अत्यंत गंभीर आहे, असे फडणवीस म्हणाले.

सामान्य माणसांवर अन्याय झाला तर त्याविरुद्ध आवाज उठवणे गैर नाही. न घाबरता प्रत्येकाला आपले मत मांडता आले पाहिजे, असेही फडणवीस यांनी नमूद केले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पीडित व्यक्ती सिव्हिल इंजिनीअर असून त्याने केलेले आरोप गंभीर आहेत, असे दरेकर यांनी म्हटले आहे. दरेकर यांनी ठाणे शहरचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी संर्पक साधून संबंधितांविरुद्ध तातडीने व नि:पक्षपातीपणे चौकशी करण्याची मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजून ९ मिनिटांनी दिवे लावण्याचे आवाहन केले होते. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत मोदींवर सडकून टीका केली होती. आव्हाड यांनी आपली भूमिका ट्विट करून प्रसिद्ध केली होती. त्यांच्या प्रतिक्रियेनंतर पीडित तरुणाने आव्हाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली.

त्यानंतर सुरक्षारक्षकांनी या तरुणाला जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेऊन त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केल्याचा आरोप केला आहे. पीडित तरुणाने तक्रारीत म्हटलं आहे की, ५ एप्रिल रोजी रात्री ११.५० च्या सुमारास दोन साध्या वेशातील तर दोघे वर्दीतले पोलिस माझ्या कावेसर येथील घरी आले. त्यांनी कोणतेही कारण न सांगता पोलिस ठाण्यात नेण्याच्या नावाखाली बाहेर येण्यास सांगितले.

कारण विचारल्यानंतर मात्र १० मिनिटांमध्ये आणून सोडतो, असे पत्नीला सांगण्यात आले. त्यांच्याकडील मोबाईलही हिसकावून घेत एका पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून आव्हाड यांच्या विवियाना मॉल येथील नाथ बंगल्यावर नेले. तिथे आधीच हजर असलेल्या १५ ते २० जणांनी पोलिसांकडे असणारी फायबर काठी तुटेपर्यंत पाठीवर, कंबरेवर आणि मांड्यांवर जबर मारहाण केली. लाकडी काठी आणि लोखंडी पाईपनेही चक्कर येईपर्यंत बेदम मारहाण केली. त्यावेळी, डोक्याला आणि चेहऱ्याला मार लागणार नाही याची दक्षता घ्या, असेही घेऊन येणारे पोलिस त्या ठिकाणी बजावत होते. त्यानंतर आव्हाड यांनी जखमी अवस्थेत असलेल्या करमुले यांना फेसबुकवर पोस्ट का टाकली, अशी विचारणा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.