कोरोनाच्या सावटात एक चांगली बातमी, जर्मनीत फूटबॉल क्लब्जचा सराव सुरु

German Clubs started for practice

बर्लिन: कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वत्र बंद-बंदच्या बातम्या असताना एक चांगली बातमी आली आहे. आता जर्मनीतील फूटबॉल क्लब बायर्न म्युनिकने सराव सुरु केला आहे मात्र, अलिंगन व हस्तांदोलनास बंदी घालण्यात आली असून सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेण्यात येत आहे. म्युनीक येथील क्लब प्रशिक्षण केंद्रात सोमवारपासून हा सराव सुरू झाला आहे.

बायर्न म्युनिक हा बुंडेस्लिगा फूटबॉल लीगमधील आघाडीचा संघ आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जर्मन लीगमधील सर्वच सामने 13 मार्चपासून स्थगित करण्यात आले आहे. त्यानंतर प्रथमच मैदानात फूटबाॕल खेळतानाचे दृश्य दिसले असून खेळाडू छोट्या छोट्या गटात आणि सोशल डिस्टन्सिंगची खबरदारी घेत हा सराव करत आहेत.

खेळाडूंदरम्यान 1.5 मीटरचे अंतर राखण्यात येत आहे. कर्णधार मॕन्यूएल न्युएर, राॕबर्ट लेवांडोवस्की आणि थॉमस म्युलर सारखे स्टार खेळाडू सोबत सराव करत आहेत.

याबद्दल न्युएर म्हणतो की, छोट्या छोट्या गटात सराव करणे फारच विचित्र वाटते. पण खेळाडूंना समोर प्रत्यक्षात मैदानावर बघून बरे वाटते. याआधी या क्लबतर्फे आॕनलाईन सराव सुरू होता. एकाचवेळी खेळाडूंची गर्दी होऊ नये यासाठी खेळाडूंना वेगवेगळ्या वेळी सरावासाठी बोलावण्यात आले. त्यात भेटीगाठीचे अलिंगन किंवा हस्तांदोलन करण्यास मनाई करण्यात आली आहे. संघातील 21 खेळाडूंची सात गटात विभागणी करण्यात आली आहे. एका गटात पाचपेक्षा अधिक खेळाडू असू नयेत याची खबरदारी घेतली गेली आहे. चेंजिंग रुममध्येसुध्दा खेळाडूंदरम्यान चार मीटरचे अंतर राखण्यात येत आहे. सरावादरम्यान खेळाडूंना टॕकल करण्यास मनाई आहे. प्रेक्षकांना सराव बघण्यास प्रवेशच दिलेला नाही.

बुंदेस्लिगाने सरावावर 5 एप्रिलपर्यंत बंदी घातली होती. ती मुदत संपल्यावर इतर क्लब्जनीसुध्दा सावधानतेने सराव सुरू केला आहे. या संघांना मे महिन्यात सामने सुरु होतील अशी आशा आहे. सध्या बायर्न म्युनिक चार गुणांच्या फरकाने सर्वात आघाडीवर आहे.

त्यांचे प्रतिस्पर्धी बोरुशिया डाॕर्टमंडच्या खेळाडूंनीसुध्दा सराव सुरु केला आहे. त्यांचे खेळाडूसुध्दा सराव सत्रानंतर मैदानाठिकाणी आंघोळ करत नाही किंवा खात नाहीत. फ्रीबर्ग व वेर्डर ब्रेमेन या क्लब्जनी मात्र अजून सुरुवात केलेली नाही.