आफ्रिकन वंशाच्या जॉर्ज फ्लॉयडचा पोलीस कोठडीत मृत्यू; अमेरिकेत हिंसक आंदोलन

Stop Killing Black People

मिनियापोलिस :- अमेरिकेतील मिनियापोलिस शहरातील पोलीस कोठडीत जॉर्ज फ्लॉयड या आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला; त्याचे अमेरिकेत हिंसक पडसाद उमटले आहेत. वेगवेगळ्या शहरांमध्ये हिंसाचार, दंगली सुरू आहेत.

शेकडोच्या लोकांनी व्हाइट हाऊसबाहेर निदर्शने केली. व्हाइट हाऊस बंद करण्यात आले आहे. न्यूयॉर्क, अटलांटा, डेनेवर, डेट्रॉईट आणि इतर काही शहरांतही शुक्रवारी हिंसाचार झाला. अमेरिकेतील सहा मोठ्या शहरांत मोठ्या दंगली झाल्या.

शुक्रवारी जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून आंदोलने सुरू आहेत. काही ठिकाणी पोलीस आणि निदर्शकांमध्ये चकमकी झाल्या. जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे.

डेनेवर, लास वेगास, लॉस एंजिलिस या शहरांमध्ये हजारावर निदर्शक ‘ जॉर्ज फ्लॉयड यांना न्याय द्या’ या मागणीचे फलक घेऊन रस्त्यावर उतरले होते. या प्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

या घटनेवर – पोलीस कोठडीत घडलेली घटना खूप भयानक आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे  अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. फ्लॉयड यांच्या कुटुंबीयांशी मी बोललो; ती खूप चांगली माणसं आहेत, असे ट्रम्प म्हणाले. जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूमुळे अमेरिकेत कृष्णवर्णीयांवर होणारा अत्याचार, अन्यायाचा मुद्दा समोर आला आहे. त्याला वांशिक भेदभावाची किनार आहे.

मिनियापोलिस हे शहर मिनियासोटा प्रांतामध्ये आहे. तिथे कर्फ्यू लावण्यात आला आहे. पेंटागॉनने अमेरिकन लष्कराच्या पोलीस विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांची मिनियापोलिस शहरात तैनाती होऊ शकते. पेंटागॉनकडून असे आदेश येणे ही फार दुर्मिळ बाब आहे. त्यातून स्थिती किती गंभीर स्थिती आहे हे लक्षात येते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER