गेहलोत यांचे शब्द जिव्हारी लागले – पायलट; गेहलोत म्हणतात, तो इतिहास झाला

Gehlot's words resounded - pilot; Gehlot says it became history

नवी दिल्ली : राजस्थान सरकारमधील अस्थिरता आता संपुष्टात आली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी पक्षासोबत जी बंडखोरी पुकारली होती ती आता शमलेली आहे. पायलट यांनी कॉंंग्रेसचा राजीनामा दिला नसला तरी त्यांनी पक्षासोबत पुकारलेल्या बंडामुळे राजस्थान सरकारवर मोठे संकट कोसळले होते. ते आता टळले आहे.

सचिन पायलट यांचे मन वळवण्यात कॉंग्रेसचे (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) व सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना यश आले आहे. यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पायलट एक पाऊल मागे आले आहेत आणि मी नेहमी काँग्रेसचा भाग राहिलो आहे. त्यामुळे हे माझं कमबॅक नाही, अशी प्रतिक्रिया सचिन पायलट यांनी दिली आहे. सचिन पायलट यांनी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री गेहलोत यांचे शब्द जिव्हारी लागल्याची कबुलीही दिली आहे. काँग्रेस पक्ष एकजूट असून आमचं सरकार पाच वर्षं काम करेल. जे झालं तो इतिहास होता, असं म्हणत या प्रकरणावर पडदा टाकला.

सचिन पायलट म्हणाले, “मी माझ्या आजपर्यंतच्या राजकारणात खरेपणा जपला. मात्र, मला देशद्रोहाची नोटीस पाठवली याचं दुःख झालं. आम्ही पक्षासमोर मुद्दे मांडले. त्यांनी या सर्व मुद्द्यांवर रोडमॅप तयार केला आहे. मी पक्षासमोर माझ्याकडून कुठलीही मागणी केली नाही. आम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पक्षाच्या विरोधात काहीही बोललो नाही. अशोक गेहलोत माझ्यापेक्षा मोठे आहेत. मी त्यांचा सन्मान केला. त्यांनी वापरलेल्या शब्दामुळं मला वाईट वाटलं. मात्र, मी त्यावर प्रतिक्रिया देणार नाही; पण सत्य जनतेसमोर आले.”

“राजस्थानमध्ये दीड वर्षात आम्ही जे काम केलं ते पुरेशा वेगानं झालं नाही, असं मला वाटलं. मान, सन्मान मिळत नसेल तर ते मुद्दे मांडले पाहिजेत. काल हे सर्व मुद्दे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यापुढे मांडले. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. राजस्थान सरकारसाठी ते प्रश्न उपस्थित केले होते. राजकारणात कोणतीही गोष्ट वैयक्तिक नसते. जे असतं ते पक्ष आणि राज्यासाठी असतं. आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन लढलो, हे राजस्थानच्या जनतेला माहिती आहे. आम्ही सरकार बनवले आहे. ” असेही पायलट यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER