सरकार वाचवण्यासाठी गेहलोत यांची धावपळ

ताबडतोब जयपूरला या, आमदारांना निरोप

Ghelot

जयपूर : राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट २२ आमदारांना घेऊन दिल्लीला गेल्यानंतर राज्यात काँग्रेसच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ सुरू झाली आहे. मुख्यमंत्री गेहलोत सरकार वाचवण्यासाठी आमदारांची जुळवाजुळव करण्याच्या कामाला लागले आहेत.

गेहलोत यांनी पायलट आणि त्यांच्यात सुरू असलेल्या ओढाताणीचे खापर भारतीय जनता पार्टीवर फोडत भाजपा काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करते आहे, असा आरोप केला. पण पायलट २२ आमदार घेऊन दिल्लीला गेल्याने, राजस्थान काँग्रेसमधील हा वाद गेहलोत आणि पायलट यांच्यातील आहे हे उघड झाले.

आता मुख्यमंत्री गेहलोत सरकार वाचवण्यासाठी आमदारांची जुळवाजुळव करण्याच्या कामाला लागले आहेत. आमदारांनी ताबडतोब जयपूरला यावे, असा निरोप गेहलोत यांनी दिला आहे.

सकाळी १० वाजल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मंत्री, आमदारांची लगबग सुरू झाली आहे. असाल तिथून निघून या आणि जयपूरला पोहचा, असे आदेश गेहलोत यांनी काँग्रेसच्या आमदारांना दिले आहेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी मला भेटण्यासाठी मुख्यमंत्री निवासस्थानी यावे, असेही आमदारांना कळवले आहे.

राजस्थानचे वाहतूकमंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांनी सांगितले की, गेहलोत यांनी आज कॅबिनेटची बैठक घेतली. कोणत्याही काँग्रेस आमदाराचा फोन बंद लागल्यास किंवा तो न सापडल्यास घाबरू नका. त्याच्याकडे जाऊन संपर्क करा. सरकार वाचविण्याची जबाबदारी आता सर्वांची आहे, असे आदेश दिले आहेत.

पक्षाची काळजी वाटते : कपिल सिब्बल यांचे ट्विट

मध्यप्रदेशनंतर आता राजस्थानमध्ये सत्तासंघर्ष पाहायला मिळत असल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी चिंता व्यक्त केली आहे. आपल्या पक्षासाठी चिंतेत आहे. घोडे तबेल्यातून निघून गेले की आम्ही जागे होणार आहोत का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. यामध्ये त्यांनी राजस्थानचा उल्लेख केला नसून मध्यप्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे, आता सचिन पायलट असे तरुण नेते काँग्रेस गमावत असल्याने काँग्रेसच्या नेतृत्वाने यावर मौन धारण केल्यावर बोट ठेवले आहे.

पायलट यांचा आरोप

सचिन पायलट यांनी अहमद पटेल यांची भेट घेऊन गेहलोत यांच्यावर आरोप केला आहे की, गेहलोत आम्हाला बाजूला टाकत आहेत.

पटेल यांनी पायलट यांना आश्वासन दिले की – तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. दरम्यान, गेहलोत वरिष्ठ नेत्यांना राज्यात सारेकाही ठीक असल्याचे सांगत आहेत. पायलट यांना राजस्थानच्या एसओजीने चौकशीसाठी बोलावले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER