गायत्रीने फॅनफॉलोइंगचा केला असा वापर

Gayatri - Maharashtra Today

एखाद्या उत्पादनासाठी पेड पार्टनरशीप करायची असेल तर त्या उत्पादनाचे निर्माते निवड करतात ते सेलिब्रिटी कलाकारांची. हे झालं जाहिरातीचं. पण जर समाजापर्यंत एखादा संदेश पोहोचवायचा असेल तर सरकारी यंत्रणेलाही सेलिब्रिटी कलाकारच आठवतात. त्याचं कारण म्हणजे या कलाकारांचं तगडं फॅनफॉलोइंग. या कलाकारांचे फॉलोअर्स लाखोंच्याच नव्हे तर आजकाल सोशलमीडियामुळे मिलियन्सच्या घरात आहेत. त्यामुळे कलाकारांनी त्यांच्या पेजवरून केलेली जाहीरात असो किंवा एखादं आवाहन, त्याचा नक्कीच जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचण्यासाठी फायदा होतो. हे बिझनेस सिक्रेट जाहिरातदारांचा यूएसपी असतच, पण आता दस्तूरखुद्द कलाकारांनीही आपल्या वाढत्या फॉलोअर्सचा उपयोग समाजाला कसा होईल हे ओळखलं आहे. सध्याच्या कोरोनाकाळात जागृती करण्यासाठी अनेक कलाकार पुढे सरसावले आहेत. यामध्ये अभिनेत्री गायत्री दातार (Actress Gayatri Datar) हिनेही तिच्या फॅनफॉलोइंगचा वापर समाजजागृतीसाठी केला आहे. कोरोनाबाबत काय काळजी, घ्यावी, लसीकरण, आहार, व्यायाम याबाबत ती तिच्या सोशलमीडिया पेजवर पोस्ट करत आहे. माझ्या पेजवरून अधिकृत व उपयुक्त माहिती माझ्या लाखो फॉलोअर्सपर्यंत पोहोचली आणि त्यातील काहीजणांनाजरी त्याचा उपयोग झाला तरी मला आनंद होईल असंही गायत्री सांगते.

तुला पाहते रे या मालिकेतून छोट्या पडदयावर पदार्पण करून लोकप्रियता मिळवलेल्या गायत्री दातारचे सोशलमीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. सध्या ती चला हवा येऊ द्या या शोमध्ये विनोदी पंच मारताना दिसत आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर मराठी मालिका, शोज चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेर गेले. सध्या गायत्री शूटिंगच्या निमित्ताने जयपूर येथे आहे. कोरोनाचा कहर आणि अजूनही लोकांची बेफिकीरी यावरही गायत्रीने भाष्य केले आहे. गायत्रीला व्यायामाची आवड आहे. या आवडीतूनच तिने व्यायामाची अधिकृत माहितीही संकलित केली आहे. शिवाय गायत्री नेहमीच सोशलमीडियावर सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मला काय मदत करता येईल असा विचार करत असताना गायत्रीला ही कल्पना सुचली.

गायत्री सांगते, आम्ही कलाकार सोशलमीडियावर आमचा एक फोटो पोस्ट करतो तेव्हा त्याला हजारो लाइक्स येतात, लाखो व्ह्यूज मिळतात. आजपर्यंत मीदेखील अनेक फोटो, व्हिडिओ, ऑफस्क्रिन धमालचे किस्से पोस्ट केले आहेत. आमचे चाहते आम्हाला सतत फॉलो करत असतात. आम्ही काय पोस्ट केले आहे याकडे त्यांचे लक्ष असते. मग याच लोकप्रियतेचा उपयोग सध्याच्या कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या काळात जर चांगल्या प्रकारे करता आला तर असा विचार माझ्या मनात आला. मी उत्तम व्यायाम करते, मग त्याबाबतच्या टिप्स जर मी माझ्या सोशलमीडिया पेजवरून दिल्या तर त्या लाखो लोकापर्यंत माझ्या फॉलोअर्सच्या माध्यमातून पोहोचतील याची मला खात्री होती. सध्या मी कोरोनाची लागण झालेल्यांनी कोणते व्यायाम करावेत याच्या टिप्स देत आहे.

कोरोनाग्रस्तांसाठी जितकी औषधे महत्त्वाची आहेत, जितका आहार महत्त्वाचा आहे तितकाच व्यायामही महत्वाचा आहे. त्यासाठीच मी या टिप्स देत आहे. हा उपक्रम सुरू केल्यावर मला अनेकांकडून प्रतिक्रिया आल्या, कौतुकही झाले. मी डॉक्टर नाही, पोलिस नाही, याचा अर्थ मी कोरोनायोद्धा होऊ शकत नाही का हा प्रश्न आता प्रत्येकाने स्वताला विचारला पाहिजे. मी तो स्वताला विचारला तेव्हा मला उत्तर मिळाले की, जे तुझ्याकडे आहे ते तू लोकांना माहितीच्या स्वरूपात दे. आजपर्यंत मी सोशलमिडियावर खूप पोस्ट केल्या. स्टायलीश ड्रेसपासून ते मेकअपलूकपर्यंत. पण आता कोरोनाग्रस्तांना व्यायामाची माहिती देणाऱ्या पोस्ट करताना मला जो आनंद व समाधान मिळत आहे त्याला तोड नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button