लोकसभेच्या उपकार भावना गवळी विसरल्या

Bhawna Gawali

मोदी लाटेमध्ये 2014 च्या आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेचे खासदार मोठ्या संख्येने महाराष्ट्रात निवडून आले. शिवसेनेला 2019 मध्ये तब्बल 18 जागा मिळाल्या. आपल्या विजयाबद्दल शिवसेनेच्या खासदारांना कोण्या एका व्यक्तीबद्दल कृतज्ञ राहायचे असेल तर त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या फोटोला रोज मन लावून नमस्कार करावा आणि उदबत्ती लावावी. कारण मोदी फॅक्टर नसता तर हे लोक खासदार म्हणून लोकसभेत दिसले नसते.

विदर्भाचा विचार केला तर रामटेकचे  कृपाल तुमाने, वाशीम- यवतमाळच्या भावना गवळी आणि बुलडाण्याचे प्रतापराव जाधव या तिन्ही खासदारांबाबत हे शंभर टक्के सत्य आहे. तुमाने आणि प्रतापराव जाधव यांना या गोष्टीची पुरेपूर कल्पना आणि जाणीवदेखील आहे, पण ही जाणीव  भावना गवळी यांनी मात्र ठेवलेली नाही. कारण ज्या मोदी-शहांच्या भरोशावर त्या जिंकल्या त्यांच्याच नेतृत्वातील भाजपविरुद्ध त्यांनी वाशिम जिल्ह्यात खुलेआम एकतर बंडखोर उभे केले आहेत किंवा आपली ताकद काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभी केली आहे अशी उघड चर्चा होत आहे.

वाशीम-यवतमाळमधील भाजपची पक्षसंघटना भावना गवळी यांच्यासाठी अहोरात्र झटली त्याचाही विसर ताईंना पडला असून भाजपविरुद्ध बंडखोरांना खतपाणी घालण्याचा अजेंडा त्यांनी राबविला असल्याची भावना भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली.

परवा वाशिममध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीर सभा झाली. लोकसभेची निवडणूक पुन्हा येणारच नाही असं समजू नका असा गर्भित इशारा त्यांनी भावना गवळी यांना नाव न घेता दिला. मुख्यमंत्र्यांच्या या इशाऱ्यानंतर बंडोबांना थंडोबा करण्याचे काम भावनाताई करतील अशी अपेक्षा होती पण ती फोल ठरली आहे.

वाशिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार लखन मलिक हे महायुतीचे उमेदवार आहेत. मात्र त्याठिकाणी निलेश पेंढारकर हे बंडखोरी करून उभे आहेत. त्यांना भावनाताईंचा छुपा पाठिंबा असल्याची उघड चर्चा मतदारसंघात होत आहे. यवतमाळमध्ये भाजपाचे उमेदवार मदन येरावार यांच्याविरोधातही बंडखोरीला उत्तेजन दिले जात आहे. कारंजा या वाशिम जिल्ह्यातील मतदारसंघात भाजपचे राजेंद्र पाटणी उमेदवार आहेत. पाटणी पूर्वी शिवसेनेत होते पण त्यांचे भावनाताईंशी कधीही पटले नाही. त्या संघर्षातूनच ते शिवसेनेमधून बाहेर पडले आणि भाजपमध्ये गेले. 2014 मध्ये आमदार म्हणून निवडून आले. कारंजाची जागा युतीमध्ये शिवसेनेला सुटावी यासाठी भावनाताईंनी बराच आटापिटा केला. कारण राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले माजी आमदार प्रकाश डहाके यांना शिवसेनेची उमेदवारी देण्याचे ताईंच्या मनात होते आणि त्यानिमित्ताने पाटणी यांना घरी बसवता आले असते, पण कारंजाची जागा भाजपकडेच कायम राहिली.डहाके हे शिवबंधन तोडून राष्ट्रवादीत गेले. आता पाटणी विरुद्ध डहाके या लढतीत ताईंची भूमिका संदिग्ध मानली जाते. त्यांची ताकद डहाके यांच्या पाठीशी तर नाही ना अशी शंका घेतली जात आहे. ताईंनी जाहीरपणे आपली भूमिका याबाबत मांडली पाहिजे असे जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

वाशिम जिल्ह्यातील रिसोड मतदार संघात ताईंचे राजकारण आणखीच वेगळे चालले आहे. तेथे काँग्रेसचे अमित झनक  विद्यमान आमदार आणि उमेदवार आहेत. झनक कुटुंबाशी भावनाताईंचे चांगले संबंध आहेत. त्याचवेळी झनक यांच्याविरोधात माजी खासदार अनंतराव देशमुख उभे आहेत. भावनाताई आणि अनंतराव यांच्यातून विस्तवदेखील जात नाही. रिसोडमध्ये शिवसेनेने वसंतराव सानप यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी आनंदरावांना रोखण्यासाठी ताई काय करतात याबाबत उत्सुकता आहे. तूर्त तरी लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजप यांनी केलेले उपकार ताई विसरल्या अशी चर्चा आहे.