गौतमीने वाचवले अनेकांचे जीव

Gautami Deshpande

प्रवासात कुणाला काय अनुभव येईल हे काही सांगता येत नाही. तुमच्या आमच्याच नव्हे तर सेलिब्रिटी कलाकारांच्या गाठीशीही असे अनेक अनुभव असतात आणि ते त्यांच्या सोशलमीडियावर शेअर करत असतात. अनेक कलाकार हे पुण्यात राहतात आणि मुंबईत शूटिंगसाठी जाण्याकरीता त्यांना हायवेवरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे कधी काय वेळ येईल हेही सांगणे कठीण. असाच अनुभव अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) हिला आला. घाटात गौतमीची गाडी स्लीप झाली पण तिने गाडीवर नियंत्रण मिळवलच पण स्लीप होण्याचं कारण शोधून हायवे पोलिसांनाही कळवलं. पोलिसयंत्रणेने तत्काळ अपघाताचं कारण शोधून उपाय केला ज्यामुळे पाठीमागून येणाऱ्या कित्येक वाहनचालकांचा जीव वाचण्यास मदत झाली. गौतमीने शेअर केलेल्या या अनुभवासाठी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

माझा होशील ना या मालिकेतून सई या भूमिकेने घराघरात पोहोचलेली गौतमी देशपांडे हिच्या आयुष्यात दोन दिवसांपूर्वीच ही घटना घडली. सई मुळची पुण्याची असून ती कामाच्या निमित्ताने मुंबईत राहते. पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी ती निघाली तेव्हा तिने हा अनुभव घेतला. गौतमी सांगते, त्या दिवशी मुंबईला जाण्यासाठी मी गाडी चालवत निघाले. हायवेला घाटात आल्यानंतर एका वळणावर माझी गाडी स्लीम झाली. मला क्षणभर काहीच कळेना. माझा स्टेअरिंगवरचा ताबा सुटला. कशीबशी मी गाडी कंट्रोल केली आणि पुढे जाऊन एका लेनवर थांबले. त्याचवेळी माझ्या मागून येणारी एक गाडीही त्याच ठिकाणी स्लीप झाली. त्या गाडीचा वेग जास्त असल्याने ती स्लीप झाल्यानंतर गोल फिरली आणि थांबली. सुदैवाने त्या गाडीतील लोकांना काही इजा झाली नाही. पण ती घटना पाहून मला जरा त्या जागेबाबत संशय आला. त्या गाडीतील लोक पुन्हा पुढे निघून गेले पण मला काही केल्या राहवेना. माझ्याकडे हायवे पोलिसांचा नंबर होता, त्यावर मी फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. नेमका स्पॉट सांगितला आणि पोलिस येईपर्यंत थांबले. पोलिस काही वेळात आले आणि त्यांनी त्या जागेची पाहणी केली असता, त्याठिकाणी डिझेल सांडल्याने गाड्या स्लीप होत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्यावर माती टाकून ती जागा स्वच्छ केली. ज्यामुळे पुढचे अनर्थ टळले. एक नागरीक म्हणून मला मी केलेल्या या कामाचे खूप समाधान वाटले. पोलिसांनीही माझे आभार मानले.

गौतमीने हा किस्सा शेअर करताना असेही तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की प्रवास करत असताना आपण सजग नागरीक असले पाहिजे. कधी कोणतीही वेळ आपल्यावर येऊ शकते यासाठी हायवे पोलिसांचे संपर्क क्रमांक नोंद करून ठेवावेत. खरंतर गौतमी या अपघातातून बचावली आणि तिने प्रसंगावधान राखून अनेक प्रवाशांचे जीवही वाचवले आहेत. सुरूवातीला गौतमी अपघातातून बचावली असे मेसेज व्हायरल झाले पण त्यानंतर गौतमीचे हा किस्सा शेअर करताच तिच्या कामाचे कौतुक झाले आणि तिला शुभेच्छाही मिळाल्या.

गौतमी सध्या माझा होशील ना या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत विराजस कुलकर्णी हा तिचा नायक असून या दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत आहे. सध्या हे ऑनस्क्रिन जोडपं मनालीला हनिमून साजरा करण्यासाठी गेलं आहे. गौतमी एक उत्तम गायिका असून ती तिचे आणि अभिनेत्री बहिण मृण्मयी हिच्यासोबतचे गाण्याचे व्हिडिओ शेअर करत असते. मृण्मयीच्या मन फकीरा या सिनेमासाठी तिने गायनही केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button