गौतमी बघतेय शेत घेण्याचं स्वप्न

gautami deshpande

आजकाल प्रत्येकालाच वाटतं की नोकरी व्यवसायासोबत एक वेगळं फर्म असावं ज्यातून आपला छंद जपला जाईल. वडिलोपार्जित घरासोबत नातं जपतानाही एखाद्या आलिशान सोसायटीत फ्लॅट असावा, निसर्गाच्या कुशीत टुमदार बंगला असावा जिथे विश्रांतीसाठी जाता येईल. सेलिब्रिटी कलाकारही याला अपवाद नाहीत. १६ ते १८ तासांच्या शिफ्ट केल्यानंतर येणारा शीण त्यांच्याशिवाय कोण जाणेल. सुट्टी मिळाली की मग कलाकार असेच सहलीच्या निमित्ताने भटकून येतात. माझा होशील ना या मालिकेतून सध्या श्रीमंत बापाची लाडावलेली लेक साकारणाऱ्या सई अर्थात गौतमी देशपांडे (Gautami Deshpande)  हिनेदेखील असेच एक स्वप्नं पाहिले आहे आणि पाच कोटी रूपये साठले की गौतमी एक शेत विकत घेऊन तिथे ऐसपैस घर बांधणार आहे. मालिकेतून सुटी मिळाली की अर्थातच तिचा मुक्काम तिच्या या स्वप्नातल्या फार्महाऊसमध्येच असणार असं तिने ठरवूनच टाकलं आहे.

सुरेल गळा असलेल्या गौतमी देशपांडे हिने मंचावर आलापीच्या ताना देण्याऐवजी बहिण मृण्मयीप्रमाणे अभिनयाच्या क्षेत्रात सूर मिळवला. सध्या तिची माझा होशील ना ही मालिका चांगलीच लोकप्रिय होतेय. विराजस कुलकर्णी या तिच्या लहानपणीच्या मित्रासोबतच पडद्यावर नायिका साकारण्याची संधी मिळाल्याने या दोघांची केमिस्ट्री चांगलीच जुळून आली आहे. आजकाल सेटवर कलाकारांची धमाल मस्ती सुरू असते. शॉट तयार होण्याच्या मधल्या वेळेत एकमेकांना काय आवडतं, पैसे साठवून कोण कोण काय प्लॅन करतय याच्या खबऱ्या काढण्याचा उद्योग मालिकेच्या सेटवर सुरू असतो. माझा होशील ना या मालिकेतील सगळेच कलाकार इरसाल आणि गपिष्ट असल्याने अशा गप्पांना नेहमीच उधाण आलेले असते. मालिकेतील आदित्य म्हणजे विराजसला जादूचे प्रयोग करण्याचा छंद असल्याने प्रत्येकजण त्याला रोज तरी एक जादू दाखव म्हणून पिडत असतो हे आता काही नवीन राहिलेले नाही. आदित्यच्या ऑनस्क्रीन मामांनाही विनोदाची चांगली जाण असल्याने रिकाम्यावेळेत थट्टा मस्करीला तर सीमाच नसते.

तर गेल्या आठवड्यात या मालिकेच्या सेटवर सुरू असलेल्या गप्पांमध्ये एक वेगळाच मुद्दा आला. जर पाच कोटी रूपये मिळाले किंवा पाच कोटी रूपये साठले तर त्यातून कोण कोण काय विकत घेणार. थोडक्यात सांगायचे तर पाच कोटी कसे उडवणार असा तो प्रश्न होता. प्रत्येकानेच मनाचे इमले रचायला सुरूवात केली. पाच कोटीपैकी छदामही खिशात नसताना पाच कोटी रूपये कसे खर्च करणार हे सांगण्याचं विमान मात्र सगळेचजण उंचउंच उडवत होते. अर्थात पाच कोटींच्या बाबतीत सगळच गमतीत सुरू असलं तरी पाच कोटी मिळाले तर काय करेन या उत्तरात मात्र खरेपणा होता. पास होत होत हाच प्रश्न गौतमीकडे आला तेव्हा तिने काही सेकंद विचार करत जे उत्तर दिलं त्यानंतर इतरांनी हसण्यापेक्षा गौतमीच्या पाठीवर थाप मारली.

जर माझ्याकडे पाच कोटी रूपये आले किंवा अभिनय करून माझ्या खात्यात पाच कोटी रूपये साठले तर मी त्यातून एक शेत खरेदी करेन. त्या शेतात एक असं घर बांधेन की ते पक्कं शेतातलं घर वाटेल. शेणामातीने सारवलेलं, चूल असलेलं, आजूबाजूने झाडांनी वेढलेलं, दारात पाट वाहणारं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईलची रेंज पोहोचणार नाही अशा जागी असलेलं. गंमतीत का असेना गौतमीने हे स्वप्न पाहिलंय. जन्माने पुण्याची आणि सध्या कामाच्या निमित्ताने मुंबईत राहणाऱ्या गौतमीला कामाच्या हँगआउटसाठी फार्महाऊससारखा जालीम उतारा नाही असं मनापासून वाटतं. एरव्ही ती मित्रमैत्रिणींच्या शेतात जाते. तिथे चुलीवरचे जेवण जेवते. पण हे सगळं स्वत:साठी उभं करावं म्हणून ती पाच कोटींचा बेत आखत आहे.

सारे तुझ्याचसाठी या मालिकेतून हर्षद अटकरी याच्यासोबत गौतमीने टीव्ही मालिकेत पदार्पण केलं. एक बॉक्सर अशी तिची या मालिकेत भूमिका होती. शास्त्रीय गायक आणि बॉक्सर यांच्या वैवाहिक आयुष्यात येणाऱ्या उलथापालथी मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांनी एन्जॉय केल्या. सध्या गौतमी माझा होशील ना या मालिकेत दिसतेय. अभिनयाशिवाय ती एक उत्तम गायिका आहे. गाण्याचा वारसा तिला तिच्या आजीकडून आला आहे. पण गाण्यापेक्षा अभिनयातच स्थिरावलेल्या गौतमीचे शेत घेण्याचे स्वप्नं पूर्ण झाले तर तिथे तिला रियाजही करता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER