पाषाणकर सापडले, सही रे सही…

Shailendra Paranjapeपुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी पदाचा कार्यभार स्वीकारताना तीन महिन्यांत कायदा सुव्यवस्था परिस्थितीत बदल झालेला असेल, असं सांगितलं होतं. तीन महिने अद्याप झालेले नाहीत आणि कायदा सुव्यवस्था परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. रोजच्या रोज स्थानिक वृत्तपत्रांवर नजर टाकली तर येणाऱ्या गुन्हेगारीच्या बातम्यांमध्ये फार फरक पडलाय, असं काही झालेलं नाही.

अमिताभ गुप्ता पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी रुजू झाल्याला आता दोन-सव्वादोन महिने उलटून गेलेत. पुण्यातून अचानक गायब झालेले व्यावसायिक गौतम पाषाणकर ( Gautam Pashanakar ) यांना शोधून काढण्यात पुणे पोलिसांना यश आलेय. पाषाणकर २१ ऑक्टोबरला अचानक गायब झाले, त्यावेळी त्यांचे अपहरण झाले का, खंडणीसाठी हा प्रकार घडलाय का, आर्थिक विवंचनेमुळे ते स्वतःच निघून गेलेत की देणेकऱ्यांपासून वाचण्यासाठी ते गायब झालेत, असे एक ना दोन प्रश्न, शंका शक्यता वृत्तपत्रांतल्या बातम्यांमधून नेहमीप्रमाणे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छापून येत होत्या.

पाषाणकर यांना पुणे पोलिसांच्या क्राइम ब्रान्च म्हणजे गुन्हे शाखेच्या युनिट वनच्या पथकाने जयपूरमधील एका हॉटेलमधून शोधून काढलं आहे. पाषाणकर यांचे चिरंजीव कपिल पाषाणकर यांनी पुणे पोलिसांचे आभारही व्यक्त केले आहेत. वडिलांची प्रकृती खालावली आहे, असंही त्यांच्या चिरंजीवांनी नमूद केलंय. पाषाणकर हे शहरातले मोठे व्यावसायिक असल्याने त्यांच्या गायब होण्याची बातमी झाली. त्या बातमीचे फॉलो अपही प्रसारित झाले. म्हणजे पुढे काय झालेय, त्याचीही बातमी वेळोवेळी प्रसारमाध्यमांमधून झळकली. पण काही मूलभूत प्रश्न अनुत्तरितच आहेत आणि त्याची उत्तरे समाजाला मिळायला हवीत.

काही कारणाने एखादा व्यावसायिक घरातून निघून गेला तर त्याचा तपास करण्यासाठी, त्याला शोधून काढण्यासाठी करदात्याच्या पैशांचा वापर केला जातो, हे योग्य आहे का? व्यावसायकाचे अपहरण होत असेल तर समाज आणि माध्यमेही सरकारला धारेवर धरतात, गुन्हेगारांना लवकर पकडावे ही अपेक्षा करतात; कारण हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असतो. पण स्वतःहून घरातून निघून गेलेल्या व्यक्तीबद्दल पोलिसांनी घेतलेले कष्ट, त्यासाठी करावा लागलेला खर्च याचा तपशील जनतेला समजू शकतो का?

एका राजकारण्याचा वडील गायब होण्यामागे हात आहे, असं पाषाणकर यांच्या मुलाने पोलिसांना सांगितल्याचं वृत्त प्रसारित झालं होतं. संबंधित राजकीय व्यक्ती तीन दिवस मंत्रालयात बसून होती. त्यामुळे कारवाई करता आली नाही, असं पोलिसांनी सांगितल्याचं वृत्तही प्रसारित झालं होतं. आता त्या राजकीय व्यक्तीचा संबंध होता की नाही, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. दुसरं असं की, कोरोना संटकामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत आर्थिक संकटामुळे पाषाणकरच नव्हे तर अनेक उद्योजक, व्यावसायिक संकटात सापडलेले आहेत. पाषाणकरांसारखे ते सारे गायब होऊ लागले तर करदात्यांच्या पैशाचा वापर किंवा गैरवापर करून त्यांच्या शोधाची मोहीम राबवली जाणार का?

पाषाणकर सुखरूप परत आलेत आणि त्यांच्या मुलाच्या म्हणण्यानुसार आता पाषाणकर कुटुंबीय खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करू शकणार आहेत. पण ती करतानाच पाषाणकर यांच्या गायब होण्याने समाजातल्या शांतताप्रिय, न्यायप्रिय आणि कुणाच्याही अध्यातमध्यात न येणाऱ्या सामान्य नागरिकांना जी काळजी वाटली त्याची भरपाई कशी होणार? एखादा उद्योजक, व्यावसायिक अचानक गायब होतो आणि महिनाभराने एका हॉटेलमध्ये सापडतो, या गोष्टीमुळे आपलंही काही खरं नाही, ही भावना लोकांची झाली तर कोण जबाबदार?

रोजच्या रोज हरवलेल्या नागरिकांच्या बातम्या रेडिओ, टीव्हीवरून सांगितल्या जातात. त्यांचे छायाचित्रही सामाजिक जाणिवेतून दाखवले जाते. पाषाणकरांच्या तपासासाठी पोलीस पथके तपासासाठी विविध दिशांना रवाना झाली तशी ती सामान्य बेपत्ता झालेल्यांसाठी रवाना होतात का, याची माहितीही पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिली तर खूप बरं होईल.

आपल्या देशात व्हीआयपींना किंवा श्रीमंतांना वेगळा न्याय आहे ही भावना सर्वदूर पसरलेली आहे. पाषाणकरांच्या गायब होण्याच्या आणि अवतीर्ण होण्याच्या प्रकरणातून कायदा सर्वांसाठी समान आहे, ही भावना कशी पुन:स्थापित होईल, हे बघायला हवे. तसे झाले तरच पाषाणकरांचे गायब होणे आणि पुन्हा सापडणे कारणी लागेल.

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER